कुलदीप यादवचा विक्रम! दुसरी हॅट्रिक घेणारा पहिला भारतीय

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये कुलदीप यादवने विक्रमाला गवसणी घातली आहे.

Updated: Dec 18, 2019, 08:56 PM IST
कुलदीप यादवचा विक्रम! दुसरी हॅट्रिक घेणारा पहिला भारतीय title=

विशाखापट्टणम : वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये कुलदीप यादवने विक्रमाला गवसणी घातली आहे. कुलदीप यादवने हॅट्रिक घेऊन भारताचा विजय आणखी सोपा केला आहे. वनडे क्रिकेटमधली कुलदीप यादवची ही दुसरी हॅट्रिक आहे. भारताकडून वनडेमध्ये २ हॅट्रिक घेणारा कुलदीप हा एकमेव खेळाडू आहे. याआधी कुलदीपने २०१७ साली कोलकात्यामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध हॅट्रिक घेतली होती.

कुलदीप यादवने इनिंगच्या ३३व्या ओव्हरमध्ये शेवटच्या ३ बॉलला ३ विकेट घेतल्या. ३३ व्या ओव्हरच्या चौथ्या बॉलला कर्णधार विराट कोहलीने शाय होपचा कॅच पकडला. यानंतर पाचव्या बॉलला ऋषभ पंतने जेसन होल्डरला स्टम्पिंग केलं. तर सहाव्या बॉलला अल्झारी जोसेफने केदार जाधवकडे कॅच देऊन कुलदीपची हॅट्रिक पूर्ण केली. कुलदीपने वेस्ट इंडिजची सहावी, सातवी आणि आठवी विकेट घेतली. 

भारताकडून सगळ्यात पहिले हॅट्रिक घेण्याचा विक्रम चेतन शर्मा यांनी केला होता. १९८७ साली नागपूरमध्ये चेतन शर्मांनी न्यूझीलंडविरुद्ध हॅट्रिक घेतली होती. यानंतर कपिल देव यांनी १९९१ साली श्रीलंकेविरुद्ध कोलकात्यामध्ये, मोहम्मद शमीने २०१९ साली अफगाणिस्तानविरुद्ध साऊथम्पटनमध्ये हॅट्रिक घेतली होती.

२ किंवा त्यापेक्षा अधिक हॅट्रिक घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत कुलदीपला स्थान मिळालं आहे. लसिथ मलिंगाने वनडे क्रिकेटमध्ये ३ हॅट्रिक घेतल्या आहेत. तर वसीम अक्रम, शकलेन मुश्ताक, चामिंडा वास, ट्रेन्ट बोल्ट आणि कुलदीप यादव यांनी २ वेळा हॅट्रिक घेतली आहे.