भारताचे अर्धे खेळाडू ७ महिन्यानंतर मैदानात उतरणार

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामधल्या पहिल्या टेस्ट मॅचला आजपासून सुरुवात होणार आहे.

Updated: Aug 22, 2019, 06:22 PM IST
भारताचे अर्धे खेळाडू ७ महिन्यानंतर मैदानात उतरणार title=

एंटिगा : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामधल्या पहिल्या टेस्ट मॅचला आजपासून सुरुवात होणार आहे. या दोन टेस्ट मॅचच्या सीरिजपासून भारत आणि वेस्ट इंडिजच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या मोहिमेला सुरुवात होईल. एंटिगामध्ये भारतीय वेळेनुसार ही मॅच संध्याकाळी ७ वाजता सुरु होईल. भारतीय टीममध्ये असलेल्या १६ पैकी ८ खेळाडू हे ७ महिन्यानंतर आंतरराष्ट्रीय मॅच खेळणार आहेत.

ऋद्धीमान सहा याने दीड वर्षानंतर भारतीय टीममध्ये पुनरागमन केलं. मागच्या वर्षी इंग्लंड दौऱ्याआधी सहाला दुखापत झाली होती. ऋद्धीमान सहाची अंतिम ११ खेळाडूंमध्ये स्थान मिळवण्यासाठी ऋषभ पंतशी स्पर्धा आहे. पण सहाला पहिल्या टेस्ट मॅचमध्ये संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. ऋषभ पंतने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियात टेस्टमध्ये शतक केलं होतं. या दोन्ही देशात शतक करणारा तो पहिला भारतीय विकेट कीपर ठरला होता.

भारतीय टीममध्ये चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, मयंक अग्रवाल, हनुमा विहारी, इशांत शर्मा आणि उमेश यादव ७ महिन्यांनी आणि अश्विन ८ महिन्यांनी टीममध्ये आले आहेत. हे सगळे खेळाडू ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या टेस्ट सीरिजमध्ये खेळले होते.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात ७१ वर्षात ९६ टेस्ट मॅच झाल्या. यातल्या वेस्ट इंडिजने ३० मॅच आणि भारताने २० मॅच जिंकल्या. उरलेल्या ४६ मॅच ड्रॉ झाल्या. पण मागच्या १७ वर्षांमध्ये भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध एकही टेस्ट मॅच गमावली नाही. मागच्या १७ वर्षात भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये २३ मॅच खेळवण्यात आल्या. यातल्या १२ भारताने जिंकल्या तर ११ मॅच ड्रॉ झाल्या.

भारतीय टीम

विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, मयंक अग्रवाल, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रोहित शर्मा, ऋषभ पंत, ऋद्धीमान सहा, रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, उमेश यादव

वेस्ट इंडिज

जेसन होल्डर (कर्णधार), क्रेग ब्रॅथवेट, डॅरेन ब्राव्हो, शमर ब्रूक्स, जॉन कॅम्पबेल, रोस्टन चेस, रहकीम कॉर्नवॉल, शेन डाऊरिच, शॅनन गॅब्रियल, शिमरोन हेटमायर, शाय होप, कीमो पॉल, केमार रोच