Asia Cup 2023 Final India vs Sri Lanka: आशिया चषक 2023 च्या स्पर्धेमध्ये 'सुपर-4' फेरीमध्ये श्रीलंकेने पाकिस्तानवर अगदी शेवटच्या चेंडूवर रोमहर्षक विजय मिळवून अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चित केलं आहे. आता 17 सप्टेंबर रोजी श्रीलंकेचा संघ भारताविरुद्ध स्पर्धेचा अंतिम सामना खेळणार आहे. 'सुपर-4' फेरीमधील या सामन्यात विजय मिळवल्याने श्रीलंकने संघाने 11 व्या वेळा आशिया चषक स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्याचा पराक्रम केला आहे. श्रीलंकन संघ हा आशिया चषक स्पर्धेचा विद्यमान विजेता असून जेतेपद कायम ठेवण्यासाठी हा संघ आता भारताविरुद्ध 2 हात करणार आहे. मात्र आशिया चषक स्पर्धेमधील आकडेवारी पाहिल्यास भारताला अंतिम फेरीमध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळण्याऐवजी पाकिस्तानविरुद्ध खेळणं परवडलं असतं असं तुम्हालाही नक्कीच वाटेल.
भारत आणि श्रीलंकेदरम्यान आतापर्यंत आशिया चषक स्पर्धेमध्ये एकूण 22 सामने खेळवण्यात आले आहेत. त्यापैकी दोन्ही संघांनी प्रत्येकी 11 सामने जिंकले आहेत. नुकत्याच झालेल्या म्हणजेच 12 सप्टेंबर 2023 च्या सामन्यामध्ये भारताने श्रीलंकेला 41 धावांनी पराभूत केलं होतं. त्यापूर्वी 2022 च्या स्पर्धेत श्रीलंकेने भारताला 6 विकेट्स राखून पराभत केलेलं. भारताने 2016 मध्ये श्रीलंकेला 5 विकेट्सने पराभूत केलेलं. 2014 मध्ये श्रीलंकेने भारताला 2 गडी राखून तर 2012 मध्ये भारताने श्रीलंकेला 50 धावांनी पराभूत केलेलं. 2010 मध्ये दोन्ही संघ 2 वेळा आमने-सामने आले. यापैकी एक सामना श्रीलंकेनं 7 विकेट्स राखून जिंकला तर दुसरा सामना भारताने 81 धावांनी जिंकला होता. 2008 मध्ये दोन्ही संघांनी प्रत्येकी एका सामन्यात एकमेकांवर विजय मिळवला. यावर्षी भारताने श्रीलंकेला 6 विकेट्सने पराभूत केलं तर श्रीलंकेने याच स्पर्धेत त्याचा वचपा काढत पुढल्या सामन्यात भारताला 100 धावांनी धूळ चारली होती.
2004 साली हे दोन्ही संघ तब्बल 3 वेळा आमने-सामने आले. पहिला सामना श्रीलंकेने 12 धावांनी जिंकला. दुसरा भारताने 4 विकेट्स राखून जिंकला तर तिसऱ्या सामन्यात श्रीलंका भारतावर 25 धावांनी विजय मिळवण्यात यशस्वी ठरली. 2000 साली श्रीलंकेने 71 धावांनी भारतावर विजय मिळवलेला. 1997 साली भारताविरुद्धचे दोन्ही सामने श्रीलंकेने जिंकले होते. पहिला सामना 6 विकेट्सने तर दुसरा 8 विकेट्सने जिंकला होता. 1995 साली भारताने श्रीलंकेविरुद्धचे दोन्ही सामने 8 विकेट्स राखून जिंकलेले. 1990 साली श्रीलंकेने 36 धावांनी एक सामना जिंकला तर याच स्पर्धेत भारतानेही 7 विकेट्सने एक सामना जिंकलेला. 1988 साली श्रीलंकेने 17 धावांनी एक सामना जिंकलेला. अन्य एका सामन्यात भारताने श्रीलंकेला 6 विकेट्सने पराभूत केलेलं. 1984 साली भारताने 10 विकेट्स राखून श्रीलंकेवर विजय मिळवलेला.
भारत आणि पाकिस्तानदरम्यानच्या सामन्यांचा आशिया चषकमधील रेकॉर्ड पाहिल्यास श्रीलंकेपेक्षा पाकिस्तान हा भारतासाठी अधिक सोपा पर्याय ठरला असता. भारताने आतापर्यंत पाकिस्तानविरुद्ध आशिया चषक स्पर्धेत 19 सामने खेळले आहेत. यापैकी भारताने 10 सामने जिंकले आहेत. तर पाकिस्तानला भारतावर विजय मिळवण्यात 6 वेळा यश आलं आहे. यापैकी 3 सामने अनिर्णित राहिलेत. नुकत्याच सुपर-4 च्या फेरीमध्ये भारताने पाकिस्तानला 228 धावांनी पराभूत केलं होतं.
वरील सर्व आकडेवारी पाहता आशिया चषकामध्ये भारताला पाकिस्तानशी अंतिम फेरीमध्ये लढणं अधिक सोपं गेलं असतं. श्रीलंकन संघामध्ये कोणीही स्टार खेळाडू नसले तर फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही गोष्टींमध्ये सध्याचा संघ फारच उत्तम असल्याचं मागील काही सामन्यांमध्ये दिसून आलं आहे. आता या श्रीलंकन प्रश्नाचं उत्तर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ कसा सोडवतो हे 17 तारखेलाच समजेल.