नेपियर : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी आणि एकदिवसीय मालिकेमध्ये ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंडला रवाना झाला. न्यूझीलंडमध्ये भारत ५ एकदिवसीय आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेतला पहिला एकदिवसीय सामना बुधवार २३ जानेवारीला खेळवण्यात येणार आहे. न्यूझीलंडनं नुकतच घरच्या मैदानात श्रीलंका आणि पाकिस्तानला पराभूत केलं. तर दुसरीकडे भारतानं ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात पराभूत केलं. त्यामुळे दोन्ही संघाचा आत्मविश्वास दुणावलेला आहे. या दोन्ही संघांमध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळू शकते.
यावर्षी होणाऱ्या वर्ल्ड कपची तयारी करण्याच्या उद्देशातून भारतीय संघ या मालिकेकडे बघत आहे. वर्ल्ड कपआधी आता भारत फक्त १० एकदिवसीय सामने खेळणार आहे. ऑस्ट्रेलियामध्ये एकदिवसीय मालिका जिंकली असली तरी भारतापुढे मधल्या फळीतील बॅटिंगची समस्या कायम आहे. धोनीनं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिन्ही मॅचमध्ये अर्धशतकं केली होती. पण न्यूझीलंडच्या मैदानांमध्ये ट्रेन्ट बोल्ट, लॉकी फरग्युसन आणि टीम साऊदी या फास्ट बॉलरसमोर बॅटिंग करणं सोपं जाणार नाही.
सध्याचा न्यूझीलंडचा संघ ऑस्ट्रेलियाच्या संघापेक्षा नक्कीच उत्कृष्ट आहे. त्यामुळे न्यूझीलंडला त्यांच्याच देशात हरवणं मोठं आव्हान असेल. भारतानं न्यूझीलंडमध्ये ३५ पैकी फक्त १० एकदिवसीय सामने जिंकले आहेत. २०१४ साली झालेल्या एकदिवसीय मालिकेमध्ये भारताचा ०-४नं पराभव झाला होता.
न्यूझीलंड आयसीसीच्या एकदिवसीय सामन्यांच्या क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. मागच्या काही वर्षांपासून ते सातत्यानं चांगली कामगिरी करत आहेत. न्यूझीलंडच्या संघाचं संतुलनही चांगलं आहे. न्यूझीलंडच्या संघामध्ये उर्जा आहे आणि ते योग्य पद्धतीनं त्यांचं क्रिकेट खेळतात, अशी प्रतिक्रिया भारताचा कर्णधार विराट कोहलीनं दिली.
शिखर धवनचा फॉर्म, धोनीचा बॅटिंग क्रम, हार्दिक पांड्याची अनुपस्थिती या सगळ्यात संघाचं संतुलन ठेवणं भारतासाठी आव्हानात्मक ठरणार आहे. मागच्या १० सामन्यांमध्ये शिखर धवनचा सर्वाधिक स्कोअर ३५ रन आहे. त्यामुळे शुभमन गिलची भारतीय संघात पर्यायी ओपनर म्हणून निवड करण्यात आलेली आहे. पण एवढ्या लगेच धवनला संघाबाहेर काढण्याची शक्यता कमी आहे.
चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला येणाऱ्या अंबाती रायुडूही फॉर्ममध्ये नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात विराटनं धोनीला चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला पाठवलं होतं. पण सामन्याच्या परिस्थितीनुसार धोनीला कोणत्या क्रमांकावर खेळवायचं याचा निर्णय घेऊ, असं कोहलीनं आधीच स्पष्ट केलं आहे. न्यूझीलंडच्या खेळपट्ट्या आणि छोटी मैदानं पाहता प्रत्येक सामन्यात मोठा स्कोअर होणार हे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे दिनेश कार्तिक किंवा केदार जाधवला वरच्या क्रमांकावर बॅटिंगला पाठवलं जाऊ शकतं.
बॉलिंगमध्ये भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमीबरोबर तिसऱ्या फास्ट बॉलरच्या रुपात मोहम्मद सिराज किंवा खलील अहमद यांच्यापैकी एकाची निवड होईल. रॉस टेलर आणि केन विलियमसन यांच्यासारखे जगप्रसिद्ध दिग्गज बॅट्समन न्यूझीलंडकडे आहेत. या खेळाडूंना स्वस्तात माघारी पाठवण्याची रणनिती भारताच्या बॉलरना आखावी लागेल. २०१८ साली विराट कोहलीनंतर रॉस टेलरची सरासरी (९२) सर्वाधिक होती.
न्यूझीलंडमधली छोटी मैदानं बघता भारत कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल या दोन्ही स्पिनरना खेळवण्याची शक्यता कमी आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात चहलनं ६ विकेट घेतल्या होत्या. त्यामुळे पहिल्या सामन्यात चहलला संधी मिळू शकते.
भारत-न्यूझीलंड सामना कुठे-कधी पाहाल?
एकदिवसीय सीरिजचा पहिला सामना नेपियरमध्ये खेळवला जाईल.
भारतीय वेळेनुसार हा सामना सकाळी ७.३० वाजता सुरु होईल.
हा सामना स्टार स्पोर्ट्सवर लाईव्ह बघता येईल.
सामन्याचं ऑनलाईन प्रसारण हॉटस्टारवरही दाखवलं जाणार आहे.
भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, दिनेश कार्तिक, विजय शंकर, शुभमन गिल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, खलील अहमद, रवींद्र जडेजा
न्यूझीलंड : केन विलियमसन (कर्णधार), रॉस टेलर, टॉम लेथम, मार्टनि गप्टील, कोलीन डिग्रॅण्डहोम, ट्रेन्ट बोल्ट, हेनरी निकोलस, डग ब्रेसवेल, लॉकी फरग्युसन, मॅट हेन्री, कॉलीन मुनरो, ईश सोढी, मिचेल सॅण्टनर, टीम साऊदी