नॉटिंगहम : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहलीनं शानदार शतक झळकावलं आहे. टेस्ट क्रिकेटमधलं विराटचं हे २३ वं शतक आहे. १९७ बॉलमध्ये १०३ रनची खेळी करून विराट आऊट झाला. विराटच्या या खेळीमध्ये १० फोरचा समावेश होता. विराटच्या शतकाच्या जोरावर या टेस्ट मॅचमध्ये भारत मजबूत स्थितीमध्ये पोहोचला आहे. भारताची आघाडी ४५० रनपर्यंत पोहोचली आहे. या टेस्ट मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये विराटचं शतक फक्त ३ रननी हुकलं होतं. पहिल्या इनिंगमध्ये विराट ९७ रनवर आऊट झाला होता. तर पहिल्या टेस्ट मॅचमध्ये विराटनं १५१ आणि ४९ रन केले होते. २०१४ सालच्या इंग्लंड दौऱ्यामध्ये विराट कोहलीला संघर्ष करावा लागला होता. त्यावेळी ५ टेस्ट मॅचमध्ये विराटला एकही अर्धशतक करता आलं नव्हतं. पण या दौऱ्यामध्ये मात्र विराटनं मागच्या दौऱ्यातलं सगळं अपयश धुऊन काढलं आहे.
कर्णधार असताना सर्वाधिक शतक करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. कर्णधार असताना विराटनं टेस्ट मध्ये १६ शतकं केली आहेत. या यादीमध्ये दक्षिण आफ्रिकेचा ग्रॅम स्मिथ पहिल्या क्रमांकावर आहे. स्मिथनं कर्णधार असताना २५ शतकं केली होती. तर ऑस्ट्रेलियाच्या रिकी पाँटिंगनं कर्णधार असताना १९ शतकं केली होती. ऑस्ट्रेलियाच्याच अॅलन बॉर्डर, स्टीव्ह वॉ आणि स्टीव्ह स्मिथनं कर्णधार असताना १५ शतकं केली होती.