लंडन : टीम इंडियाचा कॅप्टन गेल्या 2 वर्षांपासून सातत्याने शतक लगावण्यात अपयशी ठरतोय. इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटीतील पहिल्या डावात विराटने 50 धावांची खेळी केली. तर दुसऱ्या डावात अर्धशतक अवघ्या 6 धावांनी हुकलं. विराट 44 धावा करुन माघारी परतला. विराटला चांगली सुरुवात मिळतेय. मात्र त्याला त्या खेळीचे शतकात रुपांतर करण्यात अपयश येतेय. विराट दुसऱ्या डावात 44 धावांवर बाद झाला असला तरी त्याने आणखी एक विक्रम आपल्या नावे केला आहे. (india vs england 4th test day 4 captain virat kohli complete his 10 thousand first class runs in 210 innings)
विराटने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 10 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला. विराटने 210 डावांमध्ये 10 हजार धावा पूर्ण केल्या. यासह विराट असा कारनामा करणारा संयुक्तरित्या सहावा भारतीय फलंदाज ठरला. टीम इंडियाचे विद्यमान बॅटिंग कोच विक्रम राठोर यांनीही 210 डावांमध्ये 10 हजार प्रथम श्रेणी केल्या आहेत. या सामन्याआधी विराटच्या नावे 127 सामन्यांमध्ये 9 हजार 920 धावांची नोंद होती. मात्र विराटने पहिल्या डावात अर्धशतक ठोकलं. तसंच दुसऱ्या डावात 30 वी धाव पूर्ण करताच हा कारनामा केला.
सर्वात कमी डावात 10 हजार धावा करणारे भारतीय
टीम इंडियाकडून प्रथम क्षेणीत सर्वात कमी डावांमध्ये 10 हजार धावा करण्याच्या विक्रम हा अजय शर्माच्या नावावर आहे. शर्माने अवघ्या 160 डावांमध्ये ही कामगिरी केली आहे. शर्माने एकूण 166 इनिंग्समध्ये 10 हजार 120 प्रथम श्रेणीतील धावा केल्या आहेत. शर्माने टीम इंडियाकडून 1 कसोटी आणि 31 वनडेत प्रतिनिधित्व केलंय. शर्माने आपल्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत 38 शतक आणि 36 अर्धशतक झळकावले आहेत.
अजय शर्मानंतर विजय मर्चंट यांचा दुसरा क्रमांक लागतो. मर्चंट यांनी 171 डावांमध्ये 10 हजार फर्स्ट क्लास धावा केल्या. त्यांनी एकूण 234 डावात एकूण 13 हजार 470 फर्स्ट क्लास रन्स केल्या. टीम इंडियाकडून त्यांनी 10 सामन्यांमध्ये 47.72 च्या सरासरीने 859 रन्स केल्यात. मर्चंट यांनी आपल्या प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 45 शतक आणि 52 अर्धशतक लगावले आहेत.
व्हीव्हीएस लक्ष्मनने 194 इनिंग्समध्ये 10 हजार फर्स्ट क्लास धावांचा टप्पा ओलांडला. लक्ष्मनच्या नावावर एकूण 436 फर्स्ट क्लास इनिंग्समध्ये 19 हजार 730 धावांची नोंद आहे. लक्ष्मनने टीम इंडियाकडून 134 टेस्ट, 86 वनडे खेळल्या आहेत. कसोटीत त्याने 8 हजार 781 धावा केल्या आहेत. वनडेत 2 हजार 338 रन्स आहेत. तर प्रथम श्रेणीत 55 शतक आणि 98 अर्धशतक आहेत.
सचिनने 195 डावांमध्ये 10 हजारा फर्स्ट क्लास धावा केल्या आहेत. सचिनने एकूण 490 फर्स्ट क्लास इनिंग्समध्ये 25 हजार 396 धावा केल्यात. यात 81 शतकं आणि 116 अर्धशतकं केली आहेत.
सचिननंतर राहुल द्रविडने 208 डावात 10 हजार फर्स्ट क्लास धावा केल्या आहेत. द्रविडने एकूण 497 डावात 68 शतक आणि 117 अर्धशतकांच्या मदतीने 23 हजार 794 रन्स केल्या आहेत. द्रविडने टीम इंडियाकडून 164 कसोटी सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व करताना 13 हजार 288 धावा केल्या. तर 344 वनडे सामन्यांमध्ये 10 हजार 889 रन्सची नोंद आहे.