India vs Eng Test: मुंबईचा फलंदाज सरफराज खान (Sarfaraz Khan) याची भारतीय संघाकडून खेळण्याची प्रतीक्षा अखेर संपली आहे. विशाखापट्टणम येथे इंग्लंडविरोधात (England) होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी (Test Match) त्याची निवड करण्यात आली आहे. भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा आणि केएल राहुल जायबंदी झाल्याने सरफराज खानला संधी मिळाली आहे. सरफराज खान याच्यासह उत्तर प्रदेशचा डावखुरा फिरकीपटू सौरभ कुमार आणि अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर यांचीही निवड करण्यात आली आहे.
सरफराज खानने प्रथमश्रेणीत चमकदार कामगिरी केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जबरदस्त कामगिरी करत असतानाही त्याला संधी दिली जात नसल्याने क्रिकेटचाहत्यांकडून टीका होती. सुनील गावसकर यांनीही अनेकदा यावरुन जाहीर नाराजी व्यक्त करत निवडकर्त्यांना सुनावलं होतं. त्यामुळेच सरफराज खानची निवड झाल्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी निर्णयाचं स्वागत केलं आहे.
भारतीय संघात निवड झाल्यानंतर सरफराज खानने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने लिहिलं आहे की, "भारतीय संघात खेळण्यासाठी पहिल्यांदाच बोलावणं आलं आहे. उत्सवाची तयारी करा".
यानंतर काही वेळाने सरफराजने इंस्टाग्राम स्टोरीमध्ये आपल्या वडिलांसह फोटो शेअर केला.
सरफराजने प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली असून, आतापर्यंत 45 प्रथम श्रेणी सामन्यांच्या 66 डावांमध्ये 69.85 च्या सरासरीने 3912 धावा केल्या आहेत. यात 14 शतकं आणि 11 अर्धशतकांचा समावेश आहे. 2020 मध्ये त्याने उत्तर प्रदेशविरुद्धच्या रणजी सामन्यात 301 धावांची खेळी केली होती. प्रथमश्रेणी कारकिर्दीतील त्याची ही सर्वोत्तम खेळी आहे. 2019-20 च्या रणजी हंगामातील सहा सामन्यात 154.66 च्या सरासरीने 928 धावा केल्या होत्या.
जडेजाला रविवारी एक धाव घेताना हाताला दुखापत झाली, तर राहुलने उजव्या मांडीचा भाग दुखत असल्याची तक्रार केली आहे. शुक्रवारपासून दुसरा सामना सुरु होणार असून तोपर्यंत दोघेही तंदरुस्त होणं शक्य नाही. त्यामुळे ते या सामन्याला मुकणार आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) वैद्यकीय पथक या दोघांवर लक्ष ठेवून असल्याचं पत्रकात सांगण्यात आलं आहे.
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, रजत पाटीदार, केएस भरत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), सरफराज खान, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, सौरभ कुमार.