भारत-ऑस्ट्रेलिया दुसरी टेस्ट: कुठे आणि कशी पाहाल मॅच?

भारत आणि ऑस्ट्रेलियामधल्या दुसऱ्या टेस्ट मॅचला शुक्रवार १४ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे.

Updated: Dec 13, 2018, 10:04 PM IST
भारत-ऑस्ट्रेलिया दुसरी टेस्ट: कुठे आणि कशी पाहाल मॅच? title=

ऍडलेड : भारत आणि ऑस्ट्रेलियामधल्या दुसऱ्या टेस्ट मॅचला शुक्रवार १४ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. ऍडलेडमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये भारताचा ३१ रननी विजय झाला होता. त्यामुळे ४ टेस्ट मॅचच्या या सीरिजमध्ये भारतानं १-०नं आघाडी घेतली आहे. या सीरिजमध्ये भारतानं आघाडी घेतली असली तरी दुसरी टेस्ट सुरु होण्याआधीच भारताला दोन मोठे धक्के बसले आहेत. पोटाच्या मांसपेशींना दुखापत झाल्यामुळे अश्विन तर पाठीच्या दुखापतीमुळे रोहित शर्माला या मॅचला मुकावं लागणार आहे.

पर्थमध्ये होणारा हा सामना नव्या ऑप्टिस स्टेडियमवर होणार आहे. आत्तापर्यंत या स्टेडियमवर दोन आंतरराष्ट्रीय मॅच झाल्या असल्या तरी, ही पहिलीच टेस्ट असेल. एकही टेस्ट न झाल्यामुळे ही खेळपट्टी कशी असेल याबद्दल अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे या पिचवर टॉस हा जुगार ठरू शकतो, अशात टॉस जिंकून बॅटिंग घ्यायची का बॉलिंग, तसंच खेळपट्टी जलद असल्यामुळे किती फास्ट बॉलर टीममध्ये असावेत याचा निर्णय घेणं कर्णधारांसाठी डोकेदुखी ठरू शकतो.

पिच क्युरेटरनी सांगितल्याप्रमाणे ही खेळपट्टी पर्थचं याआधीचं मैदान असलेल्या वाका प्रमाणेच जलद असेल. वाकाची खेळपट्टी ही जगातली सगळ्यात जलद खेळपट्टी मानली जाते. खेळपट्टीवरचं गवत पर्थमधली गरमी बघता खेळपट्टी तुटण्याची आणि भेगा पडण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे अशावेळी टॉस गमावून विरुद्ध कर्णधारालाच निर्णय घेऊन देणं योग्य ठरतं, असं वक्तव्य ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेननं केलं आहे.

खेळपट्टीवर असलेल्या गवतामुळे आपण खुश असल्याचं विराटनं एका वेबसाईटशी बोलताना सांगितलं. गवत असल्यामुळे ही खेळपट्टी भारताच्या फास्ट बॉलरना आणखी मदत करेल. खेळपट्टीवरचं गवत बघून आम्ही घाबरलो नाही, तर रोमांचित झालो. या टेस्टमध्ये आणखी सकारात्मक मानसिकता घेऊन मैदानात उतरू असं विराट म्हणाला. पिच क्युरेटर खेळपट्टीवरचं गवत काढणार नाही, अशी अपेक्षाही विराटनं व्यक्त केली.

विराटसमोर प्रश्न

खेळपट्टीवर गवत असल्यामुळे टीम निवडीचा मोठा प्रश्न विराटसमोर असणार आहे. या मॅचमध्ये ७ बॅट्समन ४ बॉलर घेऊन खेळायचं का? खेळपट्टी हिरवी असल्यामुळे एकाही स्पिनरला न खेळवता चारही फास्ट बॉलरना घेऊन मैदानात उतरायचं का? किंवा ६ बॅट्समन आणि ५ बॉलर अशी टीम निवडायची? याबद्दलचा निर्णय विराटला घ्यावा लागणार आहे. पण भारताची सध्याची डळमळीत बॅटिंग बघता विराट ६ बॅट्समन आणि ५ बॉलर घेऊन मैदानात उतरणार नाही, अशीच शक्यता आहे.

कशी पाहता येणार मॅच?

-पर्थमध्ये शुक्रवार १४ डिसेंबरपासून टेस्ट मॅचला सुरुवात होईल

- भारतीय वेळेनुसार सकाळी ७.५० वाजता मॅच सुरु होईल.

- या मॅचची इंग्रजी कॉमेंट्री सोनी सिक्सवर आणि हिंदी कॉमेंट्री सोनी टेन ३ वर पाहता येईल.

- दुसरी टेस्ट ऑनलाईन सोनी लिववर पाहता येईल.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये विराट कोहलीला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. या मॅचमध्ये विराट पहिल्या इनिंगमध्ये ३ रन आणि दुसऱ्या इनिंगमध्ये ३४ रन करून आऊट झाला. त्यामुळे पर्थमध्ये विराट मोठी खेळी करण्यासाठी मैदानात उतरेल. तर ऑस्ट्रेलियाच्या टीमला फॉर्ममध्ये असलेल्या चेतेश्वर पुजाराला आऊट करण्याचं आव्हान असेल. पहिल्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये पुजारानं १२३ रन आणि दुसऱ्या इनिंगमध्ये ७१ रनची खेळी केली. पुजाराच्या या कामगिरीमुळे भारताचा विजय झाला.