मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून सतत फ्लॉप शो सुरू आहे. आता कोलकाता टीमकडून खेळतानाही त्याने विशेष कामगिरी केल्याचं दिसत नाही. त्यामुळे त्याच्यावर टीका होत आहे. या खेळाडूला आता इंग्लंड दौऱ्यासाठीही संधी मिळणार नसल्याची माहिती मिळाली आहे.
पुजराला खराब फॉर्ममुळे टीममधून बाहेर बसवलं. मात्र काउंटी चॅम्पियनशिपमध्ये त्याने तीन शतकं ठोकून पुन्हा आपली दमदार कामगिरी करून दाखवली. मात्र अजिंक्य रहाणेच्या बॅटमधून काही केल्या धावा निघताना दिसत नाहीत.
अजिंक्य रहाणेच्या बाबतीत दुष्काळात तेरावा महिना अशी अवस्था झाली आहे. आधीच खराब फॉर्ममध्ये असताना आता त्याला दुखापतही झाली. त्यामुळे रहाणेला इंग्लड दौऱ्यासाठी टीममधून बाहेर बसवलं जाण्याची दाट शक्यता आहे.
हैदराबाद विरुद्ध सामन्यात अजिंक्य रहाणेला दुखापत झाली. त्यामुळे तो पुढचा सामना खेळू शकेल की नाही याबाबतही प्रश्न आहे. हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात अजिंक्य रहाणेनं 24 बॉलमध्ये 28 धावा केल्या.
अजिंक्य रहाणेला 1 कोटी रुपये देऊन कोलकाताने आपल्या टीममध्ये घेतलं. त्याने 7 सामन्यात 133 धावा केल्या. त्यामुळे रहाणेला टीममध्ये संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. तर रहाणेच्या जागी कोणाला खेळवणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.