रोहित शर्माचा 'खास माणूस' Asia Cup साठी Team India मध्ये! नंबर 4 ची समस्या सुटली?

India squad for Asia Cup 2023: भारतीय संघाच्या निवड समितीचे प्रमुख अजीत आगरकर यांच्या अध्यक्षतेखाली आज बीसीसीआयची बैठक पार पडल्यानंतर संघाची घोषणा करण्यात आली. कर्णधार रोहित शर्मा आणि अजित आगरकर यांनी संघाची घोषणा झाल्यानंतर पत्रकार परिषदही घेतली.

स्वप्निल घंगाळे | Updated: Aug 21, 2023, 03:29 PM IST
रोहित शर्माचा 'खास माणूस' Asia Cup साठी Team India मध्ये! नंबर 4 ची समस्या सुटली? title=
आज बीसीसीआयच्या बैठकीनंतर घेण्यात आला निर्णय

India squad for Asia Cup 2023: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. सध्या आयर्लंडविरुद्धच्या मालिकेमध्ये संघाचं नेतृत्व करणाऱ्या जसप्रीत बुमराहचं संघाच पुनरगमन झालं आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या तिलक वर्माला एकदिवसीय संघात पहिल्यांदाच संधी देण्यात आली आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेमध्ये दमदार कामगिरी केल्याचं बक्षिस तिलक वर्माला सिलेक्शनच्या रुपाने मिळालं आहे. तसेच के. एल. राहुल आणि श्रेयस अय्यर यांनाही दुखापतीमधून सावरल्यानंतर संघात स्थान देण्यात आलं आहे. रोहित शर्माच्या कॅम्पमधील खेळाडू म्हणून तिलक वर्माचा समावेश होतो. तिलकने अनेकदा त्याच्या जडघडणीमध्ये रोहितची मोलाची भूमिका असल्याचं नमूद केलं आहे.

रोहित सारखाच खेळतो तिलक

भारतीय संघाच्या निवड समितीचे प्रमुख अजीत आगरकर यांच्या अध्यक्षतेखाली आज बीसीसीआयची बैठक पार पडली. या बैठकीनंतर टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ या महिन्याच्या अखेरीस आशिया चषक स्पर्धेसाठी मैदानामध्ये उतरणार आहे. भारताचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीला संघात संधी देण्यात आली आहे. तिलक वर्माला पहिल्यांदाच भारतीय एकदिवसीय सामन्यामध्ये संधी देण्यात आली आहे. 2 दिवसांपूर्वीच भारताचा फिरकी पटू आर. अश्वीननेही भारतीय संघामध्ये तिलक वर्माला संधी द्यावी असं म्हटलं होतं. त्याची फटकेबाजी नैसर्गिक वाटते. तो अगदी रोहित शर्मासारखाच वाटतो असं अश्वीन म्हणाला होता. रोहित शर्मानेही टी-20 मालिकेमध्ये वेस्ट इंडिजविरुद्धचा तिलक वर्माचा खेळ पाहून त्याला योग्य काय अयोग्य काय समजतं. त्याचा कधी फटका मारावा आणि कधी सोडावा हे ही कळतं असंही रोहितने त्याच्या खेळाचं विश्लेषण करताना म्हटलं होतं. मुंबई इंडियन्सच्या संघाकडून तिलक वर्मा खेळत असल्याने रोहितने त्याची फलंदाजी फार जवळून पाहिली आहे. 

वेस्ट इंडिजविरुद्ध दमदार कामगिरी

वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेमधील 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेमध्ये तिलक वर्माने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. आपल्या पदार्पणाच्या मालिकेमध्येच 20 वर्षांच्या या खेळाडूने 5 सामन्यांमध्ये 50 हून अधिकच्या सरासरीने 173 धावा केल्या. तिलकने एक अर्धशतकही झळकावलं. तिलकच्या या कामगिरीनंतरच त्याला आशिया चषक स्पर्धेसाठी संधी मिळेल अशी चर्चा होती. ही चर्चा अखेर आज खरी ठरली. भारताला चौथ्या क्रमांकावरील एक दमदार पर्याय तिलकच्या रुपाने सापडला आहे. तिलक हा डावखुरा फलंदाज असल्याने भारताच्या डावखुऱ्या फलंदाजाचा शोधही संपला आहे असं अनेकांचं म्हणणं आहे.

आयर्लंडविरुद्ध अपयशी

वेस्ट इंडिजविरुद्ध दमदार कामगिरी केली असली तर आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या 2 टी-20 सामन्यांमध्ये तिलक वर्माला अपयश आल्याचं दिसत आहे. पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवत 2-0 ची विजयी आघाडी मालिकेत मिळवली असली तरी तिलक वर्माला या सामन्यांमध्ये छाप पाडता आली नाही. पहिल्या टी-20 मध्ये तिलक पहिल्याच चेंडूवर बाद झाला तर दुसऱ्या टी-20 मध्ये तो 1 धाव काढून बाद झाला.

 

भारतीय संघ कसा आहे?

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, के. एल. राहुल, इशान किशन, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्सर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा

राखीव खेळाडू- संजू सॅमसन