IND vs PAK: भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज सामना रद्द होण्याची शक्यता; 'हे' आहे कारण!

India vs Pakistan T20 Match: T20 वर्ल्डकप 2024 चा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात 9 जून रोजी न्यूयॉर्कमध्ये होणार आहे. अमेरिकेच्या वेळेनुसार, हा सामना सकाळी साडेदहा वाजता सुरू होईल.

सुरभि जगदीश | Updated: Jun 8, 2024, 08:41 AM IST
IND vs PAK: भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज सामना रद्द होण्याची शक्यता; 'हे' आहे कारण! title=

India vs Pakistan T20 Match: सर्व क्रिकेटप्रेमींचं लक्ष आता रविवारी होणाऱ्या भारत विरूद्ध पाकिस्तान सामन्यावर आहे. टी-20 वर्ल्डकपमध्ये हा हायव्होल्टेज सामना रंगणार आहे. दरम्यान चाहते ज्या सामन्याची आतुरतेने वाट पाहयतायत त्यावर संकट येण्याची शक्यता आहे. या सामन्यासाठी केवळ एक दिवस बाकी असून या सामन्यावर पावसाचं सावट असल्याचं म्हटलं जातंय. न्यू यॉर्कमध्ये सामन्याच्या दिवशी म्हणजेच 9 जूनला पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशा परिस्थितीत चाहत्यांच्या आनंदावर पाणी फेरलं जाण्याची शक्यता आहे. 

भारत-पाकिस्तान सामन्यावर पावसाचं सावट

T20 वर्ल्डकप 2024 चा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात 9 जून रोजी न्यूयॉर्कमध्ये होणार आहे. अमेरिकेच्या वेळेनुसार, हा सामना सकाळी साडेदहा वाजता सुरू होईल. पण भारतात हा सामना संध्याकाळी आठ वाजता सुरू होणार आहे. मात्र AQ Weather च्या रिपोर्टनुसार, न्यूयॉर्कमध्ये रात्री 11 वाजता म्हणजेच भारतात रात्री 8:30 वाजता पावसाची शक्यता आहे. यावेळी ही पावसाची शक्यता 51 टक्के असल्याची वर्तवण्यात आली आहे.

सामन्यासाठी अधिकचा दिवस नाही

आयसीसीने उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीसाठी पावसाबाबत अधिक व्यवस्था केली आहे. यावेळी लीग सामन्यांसाठी खास व्यवस्था किंवा रिझर्व डे ठेवण्यात आलेला नाही. त्यामुळे भारत विरूद्ध पाकिस्तान सामन्यात पावसाने खोडा घातला तर तो दुसऱ्या दिवशी आयोजित केला जाणार नाही. त्यामुळे हा सामना रद्द मानला जाईल. अशा परिस्थितीत दोन्ही टीमन्सा प्रत्येकी एक एक गुण मिळणार आहे. 

दुसरीकडे सामना पूर्ण करण्यासाठी आयसीसी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. यावेळी जर संपूर्ण सामना पूर्ण होऊ शकत नसला तरी तो किमान सहा ओव्हर्सचा खेळवण्यात येण्याची शक्यता आहे. जेणेकरून निकाल घोषित करता येईल. 

दोन्ही टीम्ससाठी महत्त्वाचा सामना

9 जून रोजी होणारा हा सामना भारत आणि पाकिस्तानसाठी खूप महत्त्वाचा आहे. टीम इंडियाने पहिल्या सामन्यात आयरलँडचा पराभव करून दोन गुण मिळवले आहेत. तर पाकिस्तानला पहिल्याच सामन्यात अमेरिकेकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे. टीम इंडियाला पाकिस्तानला पराभूत करून लवकरात लवकर सुपर 8 मध्ये आपले स्थान निश्चित करायचंय. त्यामुळे या सामन्यात पाकिस्तान विजय मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे.