३२ वर्षातला सर्वात मोठा विजय, मॅचमध्ये झाली ही ५ रेकॉर्ड

भारतानं इंग्लंडविरुद्धची तिसरी टेस्ट मॅच जिंकून इतिहास घडवला.

Updated: Aug 22, 2018, 06:30 PM IST
३२ वर्षातला सर्वात मोठा विजय, मॅचमध्ये झाली ही ५ रेकॉर्ड  title=

नॉटिंगहम : भारतानं इंग्लंडविरुद्धची तिसरी टेस्ट मॅच जिंकून इतिहास घडवला. ५ टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये ०-२वर पिछाडीवर असताना विराटच्या टीमनं इंग्लंडचा २०३ रननं पराभव केला आणि सीरिजमध्ये पुनरागमन केलं. पहिल्या दोन टेस्ट मॅचमध्ये झालेली निराशा भारतीय बॅट्समननी धुऊन काढली. मागच्या ३२ वर्षांमधला भारताचा इंग्लंडमधला हा सगळ्यात मोठा विजय आहे. याआधी १९८६ मध्ये भारतानं इंग्लंडमध्ये २७९ रननं विजय मिळवला होता. या विजयासोबतच भारतानं अनेक रेकॉर्ड स्वत:च्या नावावर केले.

१५०पेक्षा जास्त रननं पराभव झाल्यानंतर विजय

आधीच्या मॅचमध्ये १५० पेक्षा जास्त रननं पराभव झाल्यानंतर पुढच्या टेस्ट मॅचमध्ये विजय मिळवाणारी भारतीय टीम पाचवी बनली आहे. याआधी इंग्लंडनं ऑस्ट्रेलियाला १९५४मध्ये ३८ रननी, वेस्ट इंडिजनं ऑस्ट्रेलियाला १९९७ साली १० विकेटनी, ऑस्ट्रेलियानं भारताला बंगळुरूमध्ये १९९८ साली ८ विकेटनी, भारतानं श्रीलंकेला २००८ साली गेलमध्ये, वेस्ट इंडिजनं इंग्लंडला २०१७ साली लीड्समध्ये १०७ रननी हरवलं होतं.

पहिल्या दोन टेस्ट हरल्यानंतर विजय

पहिल्या दोन टेस्ट मॅच हरल्यानंतर तिसरी टेस्ट जिंकण्याची भारताची ही पाचवी वेळ आहे. याआधी १९७४-७५ साली कोलकात्यामध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध, १९७७-७८मध्ये मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध, २००८ साली पर्थमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध, २०१८ साली जोहान्सबर्गमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतानं पहिल्या दोन टेस्ट गमावल्यानंतर तिसरी टेस्ट जिंकली होती. पण इंग्लंडमध्ये पहिल्यांदाच हे रेकॉर्ड झालं.

इंग्लंडविरुद्ध तिसरा सर्वात मोठा विजय

भारताचा इंग्लंडविरुद्धचा हा तिसरा सर्वात मोठा विजय आहे. १९८६ साली भारतानं इंग्लंडला २७९ रननं हरवलं होतं. यानंतर २०१६ साली विशाखापट्टणममध्ये भारताचा २४६ रननी विजय झाला होता.

ट्रेन्ट ब्रिजवर दुसरा विजय

आशिया खंडाबाहेर एखाद्या मैदानात दुसऱ्यांदा विजय मिळवण्याच्या यादीत आता ट्रेन्ट ब्रिजचाही समावेश झाला आहे. याआधी भारतानं लीड्स, लॉर्ड्स, मेलबर्न, क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, सबीना पार्क आणि वाँडरर्स या मैदानांवर दोन विजय मिळवले आहेत. भारतानं सर्वाधिक ३ टेस्ट मॅच इंग्लंडच्या क्वीन्स पार्क ओवल मैदानात जिंकल्या आहेत.

कर्णधार विराटचे २ रेकॉर्ड

इंग्लंडविरुद्धच्या या विजयाबरोबरच विराट कोहलीनं सौरव गांगुलीचा रेकॉर्ड मोडला आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वात खेळलेल्या ३८ टेस्ट मॅचपैकी भारतानं २२ मॅच जिंकल्या आहेत. सौरव गांगुलीनं ४९ टेस्ट मॅचमध्ये भारताचं नेतृत्व केलं, यापैकी २१ मॅचमध्ये भारताचा विजय झाला. मोहम्मद अजहरुद्दीननं ४७ मॅचमध्ये भारताचं नेतृत्व केलं यातल्या १४ मॅच भारतानं जिंकल्या. सर्वाधिक टेस्ट मॅच जिंकणाऱ्या भारतीय कर्णधारांच्या यादीमध्ये आता विराट दुसऱ्या क्रमांकावर आहे. धोनी या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. धोनीनं ६० टेस्ट मॅचमध्ये भारताचं नेतृत्व केलं, यातल्या २७ टेस्टमध्ये भारताचा विजय झाला.

३८ टेस्टनंतर सर्वाधिक विजय

३० रिकी पाँटिंग

२७ स्टिव्ह वॉ

२२ मायकल वॉन, विराट कोहली

२१ व्हिव रिचर्ड्स, मार्क टेलर

२० अॅन्ड्र्यू स्ट्राऊस