पहिल्या टी-२०मध्ये भारताचा पराभव, पण विराट-बुमराहचा विक्रम

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या रोमहर्षक अशा पहिल्या टी-२० मॅचमध्ये भारताचा शेवटच्या बॉलवर पराभव झाला.

Updated: Feb 24, 2019, 11:40 PM IST
पहिल्या टी-२०मध्ये भारताचा पराभव, पण विराट-बुमराहचा विक्रम title=

विशाखापट्टणम : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या रोमहर्षक अशा पहिल्या टी-२० मॅचमध्ये भारताचा शेवटच्या बॉलवर पराभव झाला. विजयासाठी १२७ रनचा पाठलाग करणाऱ्या ऑस्ट्रेलियाला शेवटच्या बॉलपर्यंत झगडावं लागलं. या मॅचमध्ये भारताचा पराभव झाला असला, तरी कर्णधार विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांनी विक्रमाला गवसणी घातली आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मध्ये विराट कोहलीनं ५०० रनचा टप्पा ओलांडला आहे. या मॅचआधी विराट कोहलीनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४८८ रन केले होते, त्यामुळे त्याला ५०० रन पूर्ण करण्यासाठी १२ रनची आवश्यकता होती. पहिल्या टी-२०मध्ये विराटनं २४ रन केले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२०मध्ये ५०० रन पूर्ण करणारा विराट हा पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे. विराट वगळता आत्तापर्यंत कोणत्याच खेळाडूला ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५०० रन करता आले नाहीत.

विराटबरोबरच फास्ट बॉलर जसप्रीत बुमराहनेही विक्रम केला आहे. बुमराह हा भारताकडून टी-२० मध्ये सर्वात जलद ५० विकेट घेणारा बॉलर ठरला आहे. या मॅचआधी जसप्रीत बुमराहला ५० विकेट पूर्ण करायला दोन विकेटची गरज होती. या मॅचमध्ये बुमराहनं ४ ओव्हरमध्ये १६ रन देऊन ३ विकेट घेतल्या. यामुळे बुमराहच्या आता टी-२० क्रिकेटमध्ये ५१ विकेट झाल्या आहेत. बुमराहनं फक्त ४१ टी-२० मध्ये हे रेकॉर्ड केलं आहे. ऑफ स्पिनर आर. अश्विन हा भारताकडून टी-२० मध्ये ५० विकेट घेणारा पहिला खेळाडू होता. अश्विननं ४२ मॅचमध्ये ५० विकेटचा टप्पा गाठला होता.