INDvsENG women: रोमहर्षक मॅचमध्ये भारताचा १ रनने पराभव, सीरिज ०-३ ने गमावली

इंग्लंड महिला टीमने भारताला विजयासाठी १२० रन्सचे आव्हान दिले होते.

Updated: Mar 9, 2019, 08:04 PM IST
INDvsENG women: रोमहर्षक मॅचमध्ये भारताचा १ रनने पराभव, सीरिज ०-३ ने गमावली title=

गुवाहाटी : इंग्लंड विरुद्ध झालेल्या अटीतटीच्या तिसऱ्या टी-२० मॅचमध्ये भारतीय महिला टीमचा अवघ्या १ रनने पराभव झाला आहे. भारताला विजयासाठी अखेरच्या ओव्हरमध्ये अवघ्या ३ रन्सची गरज होती. परंतू केट क्रॉसच्या भेदक माऱ्यासमोर भारताला विजय मिळवता आला नाही. केट क्रॉसने अखेरच्या ओव्हरमध्ये केवळ १ रनच्या मोबदल्यात २ विकेट मिळवल्या. तिने पहिल्या पाच बॉलमध्ये एकही रन दिला नाही.   तर चौथ्या आणि पाचव्या बॉलवर विकेट मिळवला. केट क्रॉसने शेवटच्या बॉलवर  फक्त  १ रन दिला. या पराभवामुळे भारताने तीन टी-२० मॅचची सीरिज ०-३ अशा फरकाने गमावली आहे. 

 

इंग्लंड महिला टीमने भारताला विजयासाठी १२० रन्सचे आव्हान दिले होते. भारताला २० ओव्हरमध्ये ६ विकेट गमावून ११८ रन्स करता आल्या. विजयी आव्हानाचे पाठलाग करायला आलेल्या भारताची पहिली विकेट १० रनवर गेली. हर्लीन देओल १ रन करुन आऊट झाली. यानंतर स्मृती मंधाना आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी ४९ रन्सची पार्टनरशीप झाली. जेमिमा रॉड्रिग्ज ११ रनकरुन आऊट झाली. 

कॅप्टन स्मृती मंधानाला चांगली सुरुवात मिळाली होती. तिने आपली अर्धशतकी कामगिरी केली. पण तिला जास्त काळ टिकता आले नाही. मंधाना ५९ रन्सवर असताना आऊट झाली. मंधाना आऊट झाल्यानंतर ठराविक अंतराने भारताने विकेट गमावल्या. शेवट पर्यंत मैदानावर मिताली राज उपस्थित होती. पण तिला स्ट्राईकला जाण्याची संधी न मिळाल्या मुळे  काही करता आले नाही. मितालीने नॉटआऊट ३० रन्सची खेळी केली. भारताला तिसरी टी-२० मॅच अवघ्या १ रनने गमावावी लागली. 

 याआधी इंग्लंडने टॉस जिंकून बॅटिंग करताना २० ओव्हरमध्ये ६ विकेट गमावत ११९ रन केल्या. इंग्लंडकडून टॅमी ब्युमाँट, एमी जोन्स आणि डॅनियली वॅट या तिघांनी अनुक्रमे प्रत्येकी २९, २६ आणि २४ रन्स केल्या. भारताकडून अनुजा पाटील आणि हर्लीन देओल या दोघींनी २ विकेट घेतल्या. तर एकता बिष्ट आणि पूनम यादव या दोघींनी १-१ विकेट मिळवला.