Suryakumar Yadav: टी-20 मधील तिसऱ्या सामन्यात अखेर सूर्यकुमारला (Suryakumar Yadav) आपला सूर गवसला आहे. सूर्यकुमारने तुफान फटकेबाजी करताना 44 चेंडूत 83 धावा ठोकल्या. आपल्या या स्फोटक खेळीत त्याने 10 चौकार आणि 3 षटकार लगावले. सूर्याचा स्ट्राइक रेट यावेळी 188.63 होता. सूर्यकुमारला 'प्लेअर ऑफ द मॅच'ही देण्यात आला. दरम्यान, सामन्यानंतर सूर्यकुमारने आपल्या खराब फॉर्मवरही भाष्य केलं. यावेळी त्याने स्वत:वर टीका केली. "जर मी प्रामाणिक असेन तर मला माहिती आहे की, एकदिवसीय क्रिकेटमधील माझी आकडेवारी वाईट आहे. हे सांगताना मला काही लाज वाटत नाही. हे सर्वांना माहिती आहे", असं सूर्यकुमार यादवने म्हटलं आहे.
तिसऱ्या टी-20 सामन्यात भारतासमोर करो या मरोची स्थिती होती. हा सामना जिंकणं भारतासाठी गरजेचं होतं. अशा स्थितीत भारताने 7 गडी राखत वेस्ट इंडिजचा पराभव केला. पण अद्यापही वेस्ट इंडिज संघ 2-1 ने मालिकेत पुढे आहे.
सूर्यकुमार यादव (83) याच्याशिवाय तिलक वर्माने (49) तुफान फलंदाजी केली. वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना 5 गडी गमावत 159 धावा केल्या. भारताने 13 चेंडू राखत हा सामना जिंकला. कर्णधार हार्दिक पांड्याने विजयी षटकार लगावला. पण यामुळे त्याला ट्रोलही करण्यात आलं. याचं कारण जर हार्दिक पांड्याने जर तिलक वर्माला शेवटचा फटका लगावण्याची संधी दिली असती, तर त्याचं अर्धशतक पूर्ण झालं असतं.
सामन्यानंतर सूर्याने आपल्या खेळीवर भाष्य केलं. त्याने सांगितलं की, "पॉवरप्लेमध्ये मी मैदानावर उभं राहणं गरजेचं होतं. मी जास्तीत जास्त फलंदाजी करावं अशी संघाची अपेक्षा होती. मी स्कूप्स स्ट्रोक्सचा फार सराव केला. मला असं खेळणं आवडतं".
The fans in Guyana witnessed a SKY special in the 3rd #WIvIND T20I
Not much later, they got to meet the Player of the match @surya_14kumar himself #TeamIndia pic.twitter.com/xE6pKGtBgD
— BCCI (@BCCI) August 9, 2023
तिलक वर्मासह फलंदाजी करण्यासंबंधी सूर्यकुमार यादवने सांगितलं की, "आम्ही फार काळ एकमेकांसोबत फलंदाजी केली आहे. आम्ही दोघं एकमेकांना चांगले ओळखतो. तिलक फार आत्मविश्वासाने फलंदाजी करत होता, ज्याचा मला फायदा मिळाला".
यावेळी सूर्यकुमार यादवने स्वत:वरही टीका केली. आपल्या एकदिवसीय कामगिरीवर भाष्य करताना त्याने सांगितलं की, "एकदिवसीय क्रिकेटमधील माझे आकडे फार खराब आहेत. हे स्वीकारण्यास मला काही लाज वाटत नाही. आपण प्रामाणिक असणं गरजेचं आहे. प्रत्येकाला ही गोष्ट माहिती आहे. पण यात सुधारणा करणं हे महत्त्वाचं आहे".
सूर्याने पुढे सांगितलं की, "रोहित आणि राहुल सरांनी मला मी या फॉरमॅटमध्ये जास्त खेळत नसून, तिथे खेळण्याची आणि विचार करण्याची गरज असल्याचं सांगितलं आहे".
वेस्ट इंडिजविरोधातील एकदिवसीय मालिकेत सूर्यकुमार यादवने फक्त 19, 24 आणि 35 धावा केल्या होत्या. टी-20 मधील पहिल्या दोन सामन्यातही तो फक्त 21 आणि 1 धावा करु शकला होता. प्रशिक्षक राहुल द्रविडनेही सूर्या ज्याप्रकारे टी-20 त खेळतो तशी कामगिरी एकदिवसीय सामन्यात दिसत नाही असं सांगत टीका केली होती.
यंदाच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत सूर्या सलग तीन वेळा शून्यावर बाद झाला होता. सूर्याने 26 एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यात त्याने 24.33 च्या सरासरीने 511 धावा केल्या आहेत. याउलट त्याने 51 टी-20 सामन्यांमध्ये 45.64 च्या सरासरीने 1780 धावा केल्या आहेत.
सूर्याने फक्त एक कसोटी सामना खेळला आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये नागपुरात झालेल्या या कसोटी सामन्यात तो फक्त 8 धावा करु शकला. यानंतर सूर्याला पुन्हा कसोटी सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.