पार्ल | टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेकडून पहिल्या एकदिवसीय सामन्यात 31 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या विजयासह आफ्रिकेने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. या पराभवामुळे टीम इंडियासमोर मोठं आव्हान ठाकलं आहे. या मालिकेतील दुसरा सामना हा शुक्रवारी 21 जानेवारीला खेळवण्यात येणार आहे. (ind vs sa 2nd odi team india manegment might be makes changes in playing eleven)
आफ्रिका मालिकेत आघाडीवर असल्याने दुसऱ्या सामन्यात टीम इंडियासमोर करो या मरोचं आव्हान आहे. हा दुसरा सामना मालिकेच्या दृष्टीने निर्णायक आहे. त्यामुळे या दुसऱ्या सामन्यात पूर्ण जोर लावून सामना जिंकण्याचा मानस टीम इंडियाचा असणार आहे. तर केएल राहुलच्या नेतृत्वात खेळणाऱ्या टीम इंडियाला पराभूत करुन मालिका जिंकण्याचा प्रयत्न यजमान आफ्रिकेचा असेल.
दुसऱ्या सामन्यात बदल होणार?
पहिल्या सामन्यात पराभव झाल्याने दुसऱ्या सामन्यात टीम इंडियात बदल होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे एकूण 3 खेळाडूंना डच्चू देऊन त्यांच्या जागी युवा खेळाडूंना संधी मिळू शकते. यामध्ये श्रेयस अय्यर, रिषभ पंत आणि भुवनेश्वर कुमार या तिघांना विश्रांती देण्यात येऊ शकते. तर या तिघांच्या जागी अनुक्रमे सूर्यकुमार यादव, इशान किशन आणि मोहम्मद सिराय या तिघांना संधी मिळू शकते.