Weather Report: Ind vs Pak सामन्यातच भारताच्या आशिया कप जिंकण्याच्या स्वप्नावर फिरणार पावसाचं पाणी?

IND vs PAK Asia Cup 2023 : रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या सामन्यातही पाऊस पडणार का असा, प्रश्न चाहत्यांच्या मनात आहे. तर चाहत्यांसाठी पुन्हा एकदा वाईट बातमी आहे. 

सुरभि जगदीश | Updated: Sep 8, 2023, 11:18 AM IST
Weather Report: Ind vs Pak सामन्यातच भारताच्या आशिया कप जिंकण्याच्या स्वप्नावर फिरणार पावसाचं पाणी? title=

IND vs PAK Asia Cup 2023 : भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुन्हा एकदा हायव्होल्टेज सामना रंगणार आहे. येत्या 10 सप्टेंबर रोजी कोलंबोमध्ये या दोन्ही टीम्स आमने-सामने येणार आहेत. 2 सप्टेंबर रोजी देखील भारत-पाक सामना रंगला होता. मात्र तो सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. आता रविवारी होणाऱ्या सामन्यातही पाऊस पडणार का असा, प्रश्न चाहत्यांच्या मनात आहे. तर चाहत्यांसाठी पुन्हा एकदा वाईट बातमी आहे. 

Accuweather ने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी कोलंबोमध्ये पावसाची शक्यता 75 टक्के इतकी आहे. एशिया कपमध्ये दुसऱ्यांदा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना रद्द होणार का अशा चर्चा रंगल्या आहेत. 

Accuweather च्या रिपोर्ट्सनुसार, दिवसभर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचसोबत रविवारी दुपारी कोलंबोमध्ये 99 टक्के ढगाळ वातावरणाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. दुपारी अडीच वाजता पावसाची शक्यता 77 टक्के असेल, तर सायंकाळी 80 टक्के पाऊस कोसळू शकतो. त्यामुळे रविवारी देखील चाहत्यांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे. 

10 सप्टेंबर रोजी पावसाने सामना रद्द झाला तर...

इनसाइडस्पोर्टने दिलेल्या माहितीनुसार, जर 10 सप्टेंबर रोजीच्या भारत पाकिस्तान ( India vs Pakistan ) सामन्यात पाऊस आला तर या सामन्यासाठी रिझर्व डे ( Reserve Day ) ठेवण्यात आला आहे. त्यामुळे जर पावसामुळे 10 सप्टेंबर रोजी हा सामना खेळवता आला नाही किंवा रद्द झाला तर तो 11 तारखेला खेळवण्यात येणार आहे. 

10 सप्टेंबर रोजी पाकिस्तानविरूद्धचा सामना पावसामुळे 11 तारखेला खेळवला गेला. तर लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजेच 12 तारखेला टीम इंडियाला पुन्हा सामना खेळायचा आहे. याचाच अर्थ टीम इंडियाला सलग 2 दिवस सामने खेळावे लागू शकतात. 12 तारखेला टीम इंडियाला श्रीलंकेसोबत सामना खेळायचा आहे.

पहिला सामना पावसामुळे झाला रद्द...!

2 सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात ग्रुप स्टेजमधील सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात पावसाचा अडथळा ठरला. पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यात टीम इंडियाने फलंदाजी केली. मात्र यावेळी पाकिस्तानच्या खेळाडूंना फलंदाजी करता आली नाही. या सामन्यात पावसाने खेळ केल्याने चाहत्यांचा हिरमोड झाला. मात्र आता पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान सामना रंगणार असून पावसाचा विचार करून या सामन्यासाठी रिझर्व्ह डे ठेवण्यात आला आहे.