Harbhajan Singh On Virat Kohli: भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगने आपल्या एक्स अकाऊंटवरुन म्हणजेच ट्वीटर अकाऊंटवरुन एक मजेदार प्रतिक्रिया नोंदवली आहे. ही प्रतिक्रिया भारताचा स्फोटक फलंदाज विराट कोहलीने नोंदवलेल्या एका मजावर आहे. विराट कोहलीने त्याचा आवडता क्रिकेटपटू कोण आहे याबद्दल नुकतीच एका मुलाखतीमध्ये माहिती दिली होती. विराटने या मुलाखतीत इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्ट्रोक्स आपला आवडता खेळाडू असल्याचं म्हटलं होतं. मात्र आता यावरुनच हरभजनने विराटची फिरकी घेतली आहे.
विराट कोहलीने 'स्टार स्पोर्ट्स'ला काही दिवसांपूर्वी एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याला त्याच्या आवडत्या क्रिकेटपटूसंदर्भात विचारण्यात आलं. त्यावर विराटने सर्वकालीन आवडता खेळाडू विचारला तर मी सचिन तेंडुलकरचं नाव घेईन असं सांगितलं. सचिनला पाहतच मी लहानाचा मोठा झालो आहे, असंही विराट म्हणाला. तर सध्याच्या सक्रीय खेळाडूंपैकी माझा आवडता खेळाडू हा बेन स्ट्रोक्स आहे, असंही विराटने मुलाखतीत सांगितलं.
विराटने केलेल्या याच विधानावर हरभजन सिंगने मजेदार प्रतिक्रिया नोंदवली आहे. विराटने ज्या खेळाडूचं नाव घेतलं त्यावरुन हरभजनने शाब्दिक फिरकीमध्ये विराटला गुंडाळलं आहे. विराटने दिलेल्या उत्तराचा आधार घेत एका क्रिकेटसंदर्भातील खात्यावर सचिन तेंडुलकर आणि बेन स्ट्रोक्सचा फोटो पोस्ट करत विराटचा आदर्श क्रिकेटपटू आणि सध्याचा आवडता क्रिकेटपटू अशी कॅप्शन दिली आहे. हाच फोटो रिट्विट करत प्रतिक्रिया नोंदवताना, "हो आम्हाला बेन स्ट्रोक्स ठाऊक आहे. आम्ही अनेकदा हे मैदानात ऐकलं आहे," असं हरभजन म्हणाला आहे.
नक्की पाहा >> World Cup मधून डावलल्याने चहल दुसऱ्या देशात खेळणार समजल्यावर धनश्रीची Insta Story; म्हणाली...
हरभजनने नोंदवलेल्या प्रतिक्रियेमधून त्याला विराट मैदानामध्ये संतापल्यावर किंवा जोषात येऊन शिवीगाळही करतो असं अप्रत्यक्षपणे सुचवायचं आहे. बेन स्ट्रोक्सच्या नावाचा उच्चार एका अपशब्दाशी साधर्म्य साधाणार असल्याने हरभजनने हे 2 अर्थांचं ट्वीट करत विटारची मस्करी केली आहे. हरभजनच्या या पोस्टवर अनेकांनी मजेदार प्रतिक्रिया नोंदवल्या असून आम्हालाही हे आधीपासून ठाऊक होतं असं अनेकांनी म्हटलं आहे. तर हे गुपित आजपर्यंत फक्त भारतीयांना ठाऊक होतं असं अन्य एकाने म्हटलं आहे.
नक्की वाचा >> बांगलादेशचा पराभव केल्यानंतर बाबर भारताचा उल्लेख करत म्हणाला, 'आम्ही भारताविरुद्ध...'
दरम्यान, विराट सध्या आशिया चषक स्पर्धेमध्ये खेळत असून पाकिस्तानविरुद्धच्या साखळी फेरीमधील सामन्यात त्याला म्हणावी तशी कामगिरी करता आलेली नाही. पाकिस्तानच्या शाहीन शाह आफ्रिदीने त्याला अवघ्या 4 धावांवर बाद केलं. ऑफ स्टम्पबाहेर जाणारा चेंडू खेळण्याचा प्रयत्नात विराट बोल्ड झाला. आता पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात म्हणजेच 'सुपर-4'मधील सामन्यात विराट कसा खेळतो याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.