Sport News : आशिया कप स्पर्धेच्या थराराला आजपासून सुरूवात होत आहे. पहिला सामना श्रीलंका आणि अफगाणिस्तानमध्ये होणार आहे. मात्र क्रीडाप्रेमी भारत आणि पाकिस्तानच्या हाय व्होल्टेज सामन्याची वाट पाहत आहेत. पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या भारत आणि पाकिस्तानमधील सामने रोमांचक होतात. इतिहास पाहिला तर असाच एक सामना ज्यामध्ये हरभजन सिंह किंगमेकर ठरला होता.
शोएबची ती चूक पडली होती पाकिस्तानला महागात-
2010 मधील आशिया चषकामधील भारत-पाकमधील सामना सर्वांना आठवत असेल. अंतिम षटकापर्यंत गेलेला सामना प्रत्येकाला श्वास रोखून ठेवण्यासारखा झाला होता. भारत आणि पाकमधील त्या सामन्यात गौतम गंभीर, शोएब अख्तर आणि कामरान अकमल यांच्यात उडालेल्या खटक्यामुळे वातावरण चांगलंच गरम झालं होतं.
सामना जिंकण्याची संधी दोन्ही संघांना होती, पाकिस्तानने दिलेल्या 268 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग भारत करत होता. भारताचे प्रमुख खेळाडू विरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, विराट कोहली, धोनी, जडेजा, रैना यांनी सामना जवळ आणला मात्र मोक्याच्या क्षणी त्यांच्या विकेट्स गेल्या होत्या. त्यावेळी 47 व्या षटकामध्ये पाकिस्तानचा प्रमुख गोलंदाज शोएब अख्तर गोलंदाजीला आला तेव्हा हरभजन सिंह आणि रैना मैदानावर होते.
Pehle ki ODI ki baat hi alag h....team koi bhi ho... highlights p bhi saanse tham jaati h ... Who else remember this match? @ImRaina @harbhajan_singh @shoaib100mph #msdhoni #gambhir pic.twitter.com/rBqgdAlKX1
— Shakti (@shakti_sam1) August 23, 2022
भारताला 23 चेंडूत 33 धावांची गरज होती त्यावेळी भज्जीने शोएबला गगनचुंबी षटकार मारला होता. त्यानंतर 49 व्या षटकात शोएबला रैनाने षटकार खेचत सामना आणखी जवळ आणला. आधीच्या षटकाराच्या रागामुळे शेवटच्या चेंडूवर भज्जी स्ट्राईकला असताना शोएबने त्याला तिखट बाऊंसर टाकला.
शेवटच्या षटकात 6 चेंडू 7 धावांची गरज असताना रैना स्ट्राईक घेण्याच्या नादात धावबाद झाला. पुन्हा एकदा सामना पाकिस्तानच्या बाजुने झुकला. शेवटचं षटक हे मोहम्मद आमिर टाकत होता, अखेरच्या 2 चेंडूत 3 धावा हव्या होत्या त्यामुळे सामना भारताच्या हातून गेला असं वाटत होतं मात्र भज्जीने करिष्मा करून दाखवला.
मोहम्मद आमिरसह पाकिस्तानच्या संघाला आस्मान दाखवलं. भारताने तो सामना 3 गडी आणि 1 चेंडू राखून जिंकला होता. पाकिस्तानच्या शोएब अख्तरने भज्जीला डिवचलं त्यामुळे भज्जीचा पारा चढला आणि सामन्यामध्ये तो किंगमेकर ठरला होता. हा सामना अजुनही प्रत्येक क्रीडाप्रेमीच्या स्मरणात राहिला आहे.