IND vs NZ: भारताविरुद्धच्या टेस्टसाठी न्यूझीलंडच्या टीमची घोषणा

भारताविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी न्यूझीलंडने टीमची घोषणा केली आहे.

Updated: Feb 17, 2020, 04:42 PM IST
IND vs NZ: भारताविरुद्धच्या टेस्टसाठी न्यूझीलंडच्या टीमची घोषणा title=

वेलिंग्टन : भारताविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी न्यूझीलंडने टीमची घोषणा केली आहे. दिग्गज फास्ट बॉलर ट्रेन्ट बोल्ट याचं दुखापतीनंतर टीममध्ये पुनरागमन झालं आहे. मागच्यावर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉक्सिंग डे टेस्ट मॅचवेळी बोल्टला दुखापत झाली होती, त्यामुळे तो भारताविरुद्धच्या टी-२० आणि वनडे सीरिजला मुकला होता.

न्यूझीलंडने डावखुरा स्पिनर एजाज पटेल आणि फास्ट बॉलर काईल जेमिसनलाही टीममध्ये स्थान दिलं आहे. तर डावखुरा फास्ट बॉलर नील वॅगनरही टीममध्ये आहे. बोल्टचं पुनरागमन झाल्यामुळे न्यूझीलंडचे प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी समाधान व्यक्त केलं आहे. ट्रेन्ट बोल्टच्या अनुभव आणि उर्जेमुळे टीमला फायदा होईल, असं स्टीड म्हणाले.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिली टेस्ट २१ फेब्रुवारीपासून वेलिंग्टनमध्ये आणि दुसरी टेस्ट २९ फेब्रुवारीपासून क्राईस्टचर्चमध्ये खेळवली जाईल. पहिल्याच टेस्ट मॅचमध्ये न्यूझीलंडचा रॉस टेलर विक्रमाला गवसणी घालणार आहे. वेलिंग्टनमधली ही टेस्ट रॉस टेलरची १००वी टेस्ट मॅच आहे. १०० टेस्ट, १०० वनडे आणि १०० टी-२० आंतरराष्ट्रीय मॅच खेळणारा रॉस टेलर हा जगातला पहिला खेळाडू बनणार आहे. 

न्यूझीलंडची टीम

केन विलियमसन (कर्णधार), टॉम ब्लंडेल, ट्रेन्ट बोल्ट, कॉलिन डि ग्रॅण्डहोम, काईल जेमिसन, टॉम लेथम, डॅरेल मिचेल, हेन्री निकोल्स, एजाज पटेल, टीम साऊदी, रॉस टेलर, नील वॅगनर, बीजे वॅटलिंग