न्यूझीलंड दौऱ्याआधी भारताला धक्का, फॉर्ममधला खेळाडू टीमबाहेर

भारतीय क्रिकेट टीम न्यूझीलंडच्या दौऱ्यासाठी रवाना झाली आहे.

Updated: Jan 21, 2020, 04:36 PM IST
न्यूझीलंड दौऱ्याआधी भारताला धक्का, फॉर्ममधला खेळाडू टीमबाहेर title=

मुंबई : भारतीय क्रिकेट टीम न्यूझीलंडच्या दौऱ्यासाठी रवाना झाली आहे. पण या दौऱ्याआधीच टीमला मोठा धक्का लागला आहे. फॉर्ममध्ये असलेला शिखर धवन हा दुखापतीमुळे टी-20 सीरजसाठी टीमबाहेर झाला आहे. अजूनपर्यंत निवड समितीने शिखर धवनच्या बदली खेळाडूची घोषणा केलेली नाही.

शिखर धवनला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडेवेळी फिल्डिंग करत असताना, खांद्याला दुखापत झाली. दुखापतीमुळे शिखर धवन बॅटिंगलाही आला नाही. दुखापतीनंतर टीममध्ये पुनरागमन करणारा शिखर धवन चांगल्या फॉर्ममध्ये होता. धवनने पहिल्या वनडेमध्ये 74 रन आणि दुसऱ्या वनडेमध्ये 96 रनची खेळी केली होती. श्रीलंकेविरुद्धच्या टी-20मध्येही धवनने अर्धशतक केलं होतं.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या वनडेच्या पाचव्या ओव्हरमध्ये एरॉन फिंचने मारलेला शॉट अडवताना धवनला दुखापत झाली. धवनऐवजी युझवेंद्र चहल फिल्डिंगला आला होता. धवनला दुसऱ्या वनडेवेळीही दुखापत झाली होती, त्यामुळे तो तेव्हाही मैदानात फिल्डिंगला उतरला नव्हता.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिले 5 टी-20 मॅचची सीरिज खेळवली जाणार आहे. 24 जानेवारीपासून या सीरिजला सुरुवात होईल. यानंतर दोन्ही टीममध्ये 5 फेब्रुवारीपासून 3 वनडे मॅचची सीरिज होईल. वनडे सीरिजनंतर 2 टेस्ट मॅचची सीरिज खेळवण्यात येणार आहे. शिखर धवनऐवजी सीरिजमध्ये संजू सॅमसन, मयंक अग्रवाल किंवा पृथ्वी शॉला संधी मिळू शकते. हे तिन्ही खेळाडू सध्या न्यूझीलंडमध्ये भारत-ए कडून खेळत आहेत.