IND vs ENG Test Match : भारत आणि इंग्लंड यांच्यात येत्या 15 फेब्रुवारीपासून राजकोट येथे तिसरा कसोटी सामना खेळवला जाणार आहे. पाच सामन्यांची कसोटी मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. हैदराबाद येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघाने भारताचा 28 धावांनी पराभव केला होता. यानंतर टीम इंडिया विशाखापट्टणममध्ये खेळलेल्या दुसऱ्या कसोटीत इंग्लंडचा 106 धावांनी पराभव केला अन् इंग्लंडच्या तोंडचं पाणी पळवलं होतं. अशातच आता तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी इंग्लंडला मोठा धक्का बसलाय. इंग्लंडला पहिली कसोटी जिंकवणून देणारा खेळाडूच आता संपूर्ण सिरीजमधून बाहेर पडला आहे.
इंग्लंडचा स्टार फिरकी गोलंदाज जॅक लीच (Jack Leach ruled out) दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेतून बाहेर आहे. 32 वर्षीय जॅक लीचला हैदराबाद कसोटी सामन्यादरम्यान डाव्या गुडघ्याला दुखापत झाली, ज्यामुळे तो विझाग (विशाखापट्टणम) येथे झालेल्या दुसऱ्या कसोटीत खेळू शकला नाही. अशातच आता अबुधाबीत असलेला जॅक लीच आता थेट इंग्लंडला जाणार असल्याची माहिती इंग्लंड क्रिकेट बोर्डाने दिली आहे. तो इंग्लंडला जाऊन फिटनेस प्रक्रिया पूर्ण करेल, असंही त्यांनी सांगितलंय.
डावखुरा फिरकी गोलंदाज जॅक लीच याने आतापर्यंत इंग्लंडसाठी ३६ कसोटी सामने खेळले आहेत. या कालावधीत लीचने 34.40 च्या सरासरीने 126 विकेट्स घेतल्या आहेत. पहिल्या कसोटी सामन्यात जॅकने भारतीय फलंदाजांना कोंडीत पकडलं होतं. अशातच आता त्याच्या बदली खेळाडूच्या रुपात कोणाला संधी मिळणार? असा सवाल देखील विचारला जातोय.
इंग्लंड संघ: जॅक क्राउली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (C), बेन फोक्स (WK), रेहान अहमद, टॉम हार्टली, शोएब बशीर, जेम्स अँडरसन, मार्क वुड, ऑली रॉबिन्सन, डॅन लॉरेन्स , गस ऍटकिन्सन.
विराट कोहली संपूर्ण सिरीजमधून बाहेर
इंग्लंडसोबतच्या (IND vs ENG Test Series ) उर्वरित तीन सामन्यात विराट खेळणार याची सर्वांना आशा लागली होती.मात्र, त्यावर आता पाणी फेरलंय. विराट कोहली हा इंग्लंडविरुद्धच्या उरलेल्या तिन्ही कसोटी सामन्यांमध्ये खेळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. त्याने अनुपस्थितीबाबत संघ व्यवस्थापनाला व निवड समितीला कळवलं होतं. त्यामुळे टीमची घोषणा करताना त्याच्या नावचा विचार केला गेला नाही.