World Cup 2019: आयसीसीच्या बैठकीत पाकिस्तान बहिष्काराचा मुद्दा नाही

जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये भारताचे ४० जवान शहीद झाले.

Updated: Feb 25, 2019, 09:06 PM IST
World Cup 2019: आयसीसीच्या बैठकीत पाकिस्तान बहिष्काराचा मुद्दा नाही title=

दुबई : जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये भारताचे ४० जवान शहीद झाले. यानंतर भारतामध्ये पाकिस्तानविरुद्ध संतापाची लाट उसळली. आगामी वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानवर बहिष्कार घालण्याची मागणी जोर धरू लागली. हरभजन सिंग आणि सौरव गांगुली यांच्यासारख्या माजी खेळाडूंनी या मागणीचं समर्थन केलं. एवढच नाही, तर सर्वोच्च न्यायालयानं नियुक्त केलेल्या बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीनंही दहशतवाद पोसणाऱ्या देशांवर बहिष्कार घालावा, अशी मागणी करणारं पत्र लिहिलं. पण प्रशासकीय समितीच्या या पत्रामध्ये थेट पाकिस्तानचा उल्लेख टाळण्यात आला.

वादाच्या या पार्श्वभूमीवर दुबईमध्ये बुधवारी आयसीसीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या समितीची महत्त्वाची बैठक होत आहे. या बैठकीत वर्ल्ड कपवेळी इंग्लंडमधल्या सुरक्षेबद्दल भारताचा संशय मिटवण्यात येईल. तसंच या बैठकीत पाकिस्तानवर बहिष्काराचा मुद्दा उपस्थित केला जाणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

आयसीसीच्या या बैठकीत बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांनी आयसीसीला लिहिलेल्या पत्रावर चर्चा होईल. वर्ल्ड कपदरम्यान भारतीय टीमच्या सुरक्षेबद्दल राहुल जोहरी यांनी चिंता व्यक्त करणारं पत्र लिहिलं होतं.

'या बैठकीत आयसीसी सुरक्षा कशा प्रकारे असेल, याची माहिती देईल. सगळ्या देशांसाठी एकाच प्रकारची सुरक्षा असेल. पण पाकिस्तानवरच्या बहिष्काराचा विषयही या बैठकीत निघणार नाही. कोणत्याही देशावर बंदी घालण्याचा अधिकार आयसीसीला नाही. अशा प्रकारचा बहिष्कार सरकारकडून घातला जाऊ शकतो', असं बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्यानं सांगतिलं.

३० मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. १६ जूनला मॅन्चेस्टरमध्ये भारत आणि पाकिस्तानमधला सामना नियोजित आहे.