टेस्टच्या टॉप-११ बॅट्समनमध्ये भारताचे ५ खेळाडू

इंदूरमध्ये झालेल्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये भारताने बांगलादेशचा इनिंग आणि १३० रननी पराभव केला. 

Updated: Nov 17, 2019, 07:10 PM IST
टेस्टच्या टॉप-११ बॅट्समनमध्ये भारताचे ५ खेळाडू title=

दुबई : इंदूरमध्ये झालेल्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये भारताने बांगलादेशचा इनिंग आणि १३० रननी पराभव केला. बांगलादेशविरुद्धच्या या विजयाचा फायदा टीम इंडियाच्या खेळाडूंना झाला आहे. बॅट्समनच्या यादीत टॉप-११ खेळाडूंमध्ये टीम इंडियाचे ५ खेळाडू आहेत. महत्त्वाचं म्हणजे टेस्टमधले भारताचे सुरुवातीचे सगळे ५ खेळाडू टॉप-११ मध्ये आहेत.

बॅट्समनच्या क्रमवारीत विराट कोहली दुसऱ्या, चेतेश्वर पुजारा चौथ्या, अजिंक्य रहाणे पाचव्या, रोहित शर्मा १०व्या आणि मयंक अग्रवाल ११व्या क्रमांकावर आहे. मयंक अग्रवालची ही टेस्टमधली सर्वोत्तम कामगिरी आहे. मयंकने या टेस्टमध्ये २४३ रनची द्विशतकी खेळी केली होती. मयंकच्या जवळही कोणताच खेळाडू पोहोचला नव्हता. या मॅचमध्ये मयंकनंतर अजिंक्य रहाणेने ८६ रनची खेळी केली होती. बॅट्समनच्या यादीत स्टीव्ह स्मिथ पहिल्या क्रमांकावर कायम आहे.

बॅट्समनबरोबरच बॉलरच्या यादीत मोहम्मद शमीचाही फायदा झाला आहे. शमीने पहिल्या इनिंगमध्ये ३ आणि दुसऱ्या इनिंगमध्ये ४ विकेट घेतल्या. या कामगिरीमुळे शमीने ८ स्थानांची उडी घेतली आहे. मोहम्मद शमी बॉलरच्या क्रमवारीत सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे. शमी हा सर्वाधिक रेटिंग कमावणारा तिसरा भारतीय बॉलर बनला आहे. शमीचे आता ७९० रेटिंग पॉईंट्स झाले आहेत, तर कपिल देव यांचे ८७७ आणि जसप्रीत बुमराहचे ८३२ रेटिंग पॉईंट्स होते.

बॉलरच्या क्रमवारीत भारताचे ३ बॉलर टॉप-१० मध्ये आहेत. जसप्रीत बुमराह चौथ्या, मोहम्मद शमी सातव्या आणि अश्विन १०व्या क्रमांकावर आहे. तर रवींद्र जडेजाचा ४ स्थान फायदा होऊन तो ३५व्या क्रमांकावर आला आहे.

मयंक अग्रवालने ८ टेस्ट मॅचमध्ये ८५८ रन केले आहेत. टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात ८ टेस्टमध्ये मयंकपेक्षा जास्त रन करणारे फक्त ७ खेळाडू आहेत. डॉन ब्रॅडमन यांनी १,२१० रन, इवरटन वीक्स यांनी ९६८ रन, सुनील गावसकर यांनी ९३८ रन, मार्क टेलर यांनी ९०६ रन, जॉर्ज हेडली यांनी ९०४ रन, फ्रॅन्क वॉरेल यांनी ८९० रन आणि हर्बर्ट सटक्लिफ यांनी ८७२ रन ८ टेस्ट मॅचमध्ये केल्या.