मुंबई : आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये बीसीसीआयनं डे-नाईट टेस्ट खेळायला नकार दिला आहे. ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू इयन चॅपल यांनी मात्र बीसीसीआयच्या या निर्णयावर टीका केली आहे. काहीही करून भारताला ऑस्ट्रेलियामध्ये टेस्ट सीरिज जिंकायची आहे आणि यासाठीच त्यांनी डे-नाईट टेस्टला विरोध केला, असा आरोप चॅपल यांनी केला आहे. बीसीसीआयचा हा निर्णय निराशाजनक असल्याचं चॅपल म्हणाले. तर ऑस्ट्रेलियातल्या माध्यमांमध्येही बीसीसीआयच्या निर्णयावर अशाप्रकारे टीका सुरु आहे. भारत पराभवला घाबरत असल्यामुळे बीसीसीआयनं हा निर्णय घेतल्याचा सूर ऑस्ट्रेलियाच्या माध्यमांमध्ये आहे.
अॅडलेडमध्ये गेल्या तीन वर्षांपासून डे-नाईट टेस्ट होत आहेत. यावर्षी मात्र अॅडलेडमध्ये अशी टेस्ट होणार नाही. वॉर्नर आणि स्मिथवर बंदी घातल्यानंतर ऑस्ट्रेलियाची टीम कमजोर झाली आहे. या कमजोर टीमविरुद्ध सीरिज जिंकण्यासाठी बीसीसीआयनं हा निर्णय घेतल्याची टीका चॅपल यांनी केली आहे. टी-20 क्रिकेट जगप्रसिद्ध होत असताना टेस्ट क्रिकेट वाचवण्याचे प्रयत्न आपण केले पाहिजेत, असं चॅपल यांना वाटत आहे.
अॅडलेडच्या मैदानामध्ये मागच्या तीन वर्षांमध्ये न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान आणि इंग्लंड यांनी डे अॅण्ड नाईट टेस्ट मॅच खेळल्या आहेत. भारतानंही यावर्षी अशी टेस्ट मॅच खेळावी, अशी इच्छा क्रिकेट ऑस्ट्रेलियाची होती.
भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात टी-20 सीरिजपासून होणार आहे. २१ ते २५ नोव्हेंबरदरम्यान ३ टी-20 मॅच खेळवण्यात येणार आहेत. यानंतर चार टेस्ट मॅचची सीरिज होणार आहे. ऍडलेड (६-१० डिसेंबर), पर्थ(१४-१८ डिसेंबर), मेलबर्न(२६-३०डिसेंबर) आणि सिडनी(३-७जानेवारी)मध्ये या टेस्ट मॅच खेळवण्यात येतील. टेस्ट सीरिजनंतर १२ ते १८ जानेवारीदरम्यान ३ वनडे मॅचची सीरिज खेळली जाईल.