कोलंबो : बांग्लादेशविरुद्धच्या टी-20 ट्रायसीरिज फायनलमध्ये भारताचा सनसनाटी विजय झाला. दिनेश कार्तिक हा भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला. शेवटच्या बॉलला ५ रन्सची आवश्यकता असताना दिनेश कार्तिकनं सिक्स मारून भारताला विजय मिळवून दिला. दिनेश कार्तिकनं ८ बॉल्समध्ये २९ रन्सची स्फोटक खेळी केली. कार्तिकच्या या इनिंगमध्ये ३ सिक्स आणि २ फोरचा समावेश होता.
या विजयानंतर कार्तिकनं पत्रकारांशी संवाद साधला. मोठ्या सिक्स मारण्याचा सराव मी नेहमीच करतो. मी आज जो आहे त्याबद्दल खुश आहे, असं कार्तिक म्हणाला. मागच्या काही वर्षांपासून मला पाठिंबा दिल्याबद्दल टीममधल्या सदस्यांचे मी आभार मानतो, अशी प्रतिक्रिया कार्तिकनं दिली. तसंच अशाप्रकारे मॅच संपवण्याची प्रेरणा धोनीकडून मिळाल्याचं कार्तिक म्हणाला. धोनीचा शांतपणा मला आवडतो. यातून खूप काही शिकायला मिळतं, असं म्हणत कार्तिकनं धोनीचं कौतुक केलं.
भारताच्या या शानदार विजयाचा हिरो असलेला दिनेश कार्तिक रोहित शर्माच्या निर्णयावर नाराज होता. वरच्या क्रमांकावर बॅटिंगला पाठवण्याऐवजी दिनेश कार्तिकला सातव्या क्रमांकावर बॅटिंगला पाठवण्यात आलं. या निर्णयामुळे दिनेश कार्तिकला राग आला होता, अशी प्रतिक्रिया कॅप्टन रोहित शर्मानं दिली.
रोहितनं मात्र दिनेश कार्तिकला खालच्या क्रमांकावर बॅटिंगला पाठवण्याच्या निर्णयाचं समर्थन केलं आहे. तू मॅच संपवून यावं अशी माझी इच्छा आहे. शेवटच्या तीन ते चार ओव्हरमध्ये टीमला तुझी गरज पडेल, असं मी दिनेश कार्तिकला सांगितल्याचं रोहित शर्मा म्हणाला. सुरुवातीला नाराज झालेला दिनेश कार्तिक मॅच जिंकवल्यानंतर मात्र खुष झाल्याचं वक्तव्य रोहितनं केलं.
दिनेश कार्तिककडे असे शॉट्स आहेत ज्यामुळे तो शेवटच्या काही ओव्हरमध्ये मॅच संपवू शकतो. तसंच कार्तिक विकेट कीपर असला तरी तो फिल्डिंगही उत्कृष्ट करु शकतो, असं म्हणत रोहितनं कार्तिकचं कौतुक केलं आहे.