नवी दिल्ली : यंदाच्या आयपीएलमध्ये दिल्लीच्या टीमच्या पदरी निराशाच आली. पॉईंट्स टेबलमध्ये दिल्लीची टीम शेवटच्या क्रमांकावर राहिली. या कामगिरीनंतर आता दिल्लीच्या टीममधले वाद समोर येऊ लागले आहेत. कामगिरी खराब होत असल्यामुळे दिल्लीचा कर्णधार गौतम गंभीर पदावरून पाय उतार झाला. यानंतर श्रेयस अय्यरकडे टीमचं नेतृत्व देण्यात आलं. श्रेयसच्या नेतृत्वात गंभीर एकही मॅच खेळला नाही. कर्णधारपद सोडल्यानंतर न खेळण्याचा निर्णय गंभीरनं घेतला होता, असं दिल्लीचा प्रशिक्षक रिकी पाँटिंग म्हणाला होता. पण गंभीरनं मात्र वेगळंच वक्तव्य केलं आहे. दिल्लीच्या टीममध्ये खेळायला मी कधीच नकार दिला नव्हता. मला खेळायचं नसतं तर मी कर्णधारपद सोडलं तेव्हाच निवृत्तीची घोषणा केली असती, असं गंभीर म्हणाला.
पुढच्या वर्षी आयपीएल खेळणार का याबाबत गंभीरनं स्पष्ट उत्तर दिलं नाही. आता प्रथम श्रेणी क्रिकेट खेळून त्यावेळी चांगली कामगिरी झाली तर आयपीएल खेळायचं का नाही याचा विचार करीन, अशी प्रतिक्रिया गंभीरनं दिली आहे. माझ्या नेतृत्वात टीमला सतत पराभव स्वीकारावा लागल्यामुळे याची नैतिक जबाबदारी स्वीकारून मी राजीनामा दिल्याचं गंभीर म्हणाला. एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना गंभीरनं हे वक्तव्य केलं आहे.