AFG vs BAN: मी आशा करतो तो लवकर...; गुलबदीन नायबच्या दुखापतीच्या नाटकावर काय म्हणाला राशिद खान?

AFG vs BAN T20 World Cup 2024: उलटफेर करण्यामध्ये तरबेज असलेल्या गुलबदीन नायबने सुपर 8 च्या शेवटच्या सामन्यात बांगलादेशाविरूद्ध एकच गोंधळ केला. यावेळी सामन्यानंतरही सोशल मीडियावर त्याच्याच नावाची चर्चा होती. 

सुरभि जगदीश | Updated: Jun 25, 2024, 05:21 PM IST
AFG vs BAN: मी आशा करतो तो लवकर...; गुलबदीन नायबच्या दुखापतीच्या नाटकावर काय म्हणाला राशिद खान? title=

AFG vs BAN T20 World Cup 2024: टी-20 वर्ल्डकपमध्ये आता सेमीफायनलचं चित्र पूर्णपणे स्पष्ट झालं आहे. वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये आता भारत, इंग्लंड, अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका या टीम्सचा समावेश आहे. दरम्यान मंगळवारी सकाळी झालेल्या सामन्या अफगाणिस्तानने बांगलादेशाचा पराभव केला आणि इतिहासात पहिल्यांदा टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात स्थान मिळवलं. दरम्यान या सामन्यात गुलबदीन नायबने केलेल्या कृत्यामुळे सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे. यावेळी आता नायबवर कोणती कारवाई होणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

उलटफेर करण्यामध्ये तरबेज असलेल्या गुलबदीन नायबने सुपर 8 च्या शेवटच्या सामन्यात बांगलादेशाविरूद्ध एकच गोंधळ केला. यावेळी सामन्यानंतरही सोशल मीडियावर त्याच्याच नावाची चर्चा होती. दरम्यान याबाबत अफगाणिस्तानचा कर्णधार राशिदनेही प्रतिक्रिया दिली. या सामन्यात अफगाणिस्तानने बांगलादेशविरुद्ध ऐतिहासिक विजय नोंदवत सेमीफायनलचं तिकीट निश्चित केले आहे.

काय म्हणाला राशिद खान?

अफगाणिस्तान टीमच्या ऐतिहासिक कामगिरीनंतर राशिद खानने त्याच्या टीमचं कौतुक केलं आहे. यावेळी त्याने गुलबदीन नायबच्या दुखापतीबाबत मोठं विधान केलं आहे. राशिद म्हणाला, 'मला वाटतं गुलबदीनला क्रॅम्प आला होता. आशा आहे की तो बरा होईल. उपांत्य फेरी गाठणं आमच्यासाठी एका स्वप्नासारखं आहे. आम्ही स्पर्धेची सुरुवात कशी केली यावर सर्व काही अवलंबून आहे. न्यूझीलंडचा पराभव केल्यानंतर हा आत्मविश्वास आला. हे अविश्वसनीय आहे, माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत.

काय आहे नेमकं प्रकरणं?

या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना अफगाणिस्तानच्या टीमने 115 रन्स केले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशाच्या टीमचे एका टोकाकडून सतत विकेट पडत असल्याने अफगाणिस्तानला दिलासा मिळाला. पण दुसऱ्या टोकाला लिटन दासने अफगाण टीमच्या अडचणी वाढल्या होत्या. सामन्यावर पावसाचंही सावट दिसून येत होतं. यावेळी DLS नुसार बांगलादेश अफगाणिस्तानपेक्षा फक्त 2 रन्सने मागे होती. दरम्यान, अफगाणिस्तानचे मुख्य कोच जोनाथन ट्रॉट यांनी आपल्या खेळाडूंना खेळ काहीसा हळू करण्याच्या सूचना दिल्या. ते पाहून गुलबदीन नायब स्लिपवर उभा असताना दुखापत झाल्याचं नाटक करू लागला. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ऑस्ट्रेलिया वर्ल्डकपमधील प्रवास संपुष्टात

सुपर-8 च्या शेवटच्या सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या टीमची अवस्था पाकिस्तानसारखी झालेली पाहायला मिळाली. ज्याप्रमाणे पाकिस्तानची टीम पहिल्या फेरीत अमेरिकेच्या पराभवाची वाट पाहत होती, त्याचप्रमाणे ऑस्ट्रेलिया अफगाणिस्तानच्या पराभवासाठी प्रार्थना करत होता. मात्र अफगाणिस्तानने आपल्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाच्या आशा धुळीस मिळवल्या आहेत. त्यामुळे या सामन्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या टीमचा प्रवास संपुष्टात आला आहे.