मुंबई : भारतीय क्रिकेट टीमच्या प्रशिक्षकपदी ग्रेग चॅपलच्या नावाची शिफारस करणं ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक होती, अशी कबुली भारताचा माजी कॅप्टन सौरव गांगुलीनं दिली आहे. सौरव गांगुली कॅप्टन असतानाच ग्रेग चॅपलची भारताचा प्रशिक्षक म्हणून निवड झाली होती. पण काही काळानंतर चॅपल आणि गांगुलीमध्ये वाद झाला. या वादानंतर गांगुलीचं कर्णधारपद गेलं होतं, तसंच त्याला काही काळासाठी टीमबाहेरही जावं लागलं होतं.
२००७च्या वर्ल्ड कपनंतर मी आणि ग्रेग चॅपलमध्ये कोणतंही बोलणं झालं नसल्याचं गांगुली म्हणाला. २००३-०४ सालच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावेळी ग्रेग चॅपलनं मला बॅटिंग सुधारण्यासाठी मदत केली होती, त्यामुळे मी चॅपलला प्रशिक्षक म्हणून नेमण्यासाठी पाठिंबा दिल्याची प्रतिक्रिया गांगुलीनं दिली.
माझ्याबरोबर झालेली घटना कोणाबरोबरही घडू नये. तुम्हाला टीममधून डच्चू दिला जाऊ शकतो पण वैयक्तिक टीका होणं चुकीचं असल्याचं वक्तव्य गांगुलीनं केलं आहे. मैदानामध्ये काय होतं यावरच खेळाडूबाबत मतप्रदर्शन व्हावं, असंही गांगुली म्हणालाय. कर्णधारपद गेल्यावर माझ्या आणि राहुल द्रविडच्या नात्यामध्ये कोणताही बदल झाला नसल्याचं स्पष्टीकरण गांगुलीनं दिलं. २००५ साली गांगुलीला कर्णधारपदावरून डच्चू मिळाल्यानंतर द्रविडला कर्णधार करण्यात आलं होतं.
२००३ सालच्या वर्ल्ड कप फायनलमध्ये झालेला पराभव ही माझ्या कारकिर्दीतली सगळ्यात मोठी निराशा होती तर जून १९९६ साली टेस्ट क्रिकेटमध्ये केलेलं पदार्पण हा आनंदाचा क्षण असल्याचं गांगुली म्हणाला.