GT IPL Schedule 2024: हार्दिकची अनुपस्थिती, जायबंदी शमी अन् नवखा कर्णधार; गुजरातसमोर कडवी आव्हानं, पाहा GT चं संपूर्ण वेळापत्रक

GT IPL Schedule 2024: गेल्या अनेक दिवसांपासून क्रिकेटप्रेमींना प्रतिक्षा लागलेल्या आयपीएल स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली आहे.   

शिवराज यादव | Updated: Feb 22, 2024, 06:37 PM IST
GT IPL Schedule 2024: हार्दिकची अनुपस्थिती, जायबंदी शमी अन् नवखा कर्णधार; गुजरातसमोर कडवी आव्हानं, पाहा GT चं संपूर्ण वेळापत्रक title=

GT IPL Schedule 2024:  गेल्या अनेक दिवसांपासून क्रिकेटप्रेमींना प्रतिक्षा लागलेल्या इंडियन प्रीमिअर लीग 2024 चं वेळापत्रक अखेर जाहीर झालं आहे. आयपीएलमध्ये पहिला सामना महेंद्रसिंग धोनीचा चेन्नई सुपरकिंग्ज आणि विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुत होणार आहे. हा सामना चेन्नईत खेळवला जाणार आहे. सध्या पहिल्या टप्प्यातील वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. त्यानुसार 17 दिवसांत 21 सामने खेळले जाणार आहेत. 22 मार्च ते 7 एप्रिलपर्यंत हे सामने खेळले जाणार आहेत. 

या आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यासह गुजरात टायटन्सकडेही चाहत्यांचं लक्ष असणार आहे. याचं कारण गुजरात टायटन्स फक्त दोन हंगाम खेळले असून, दोन्ही वेळा त्यांनी जबरदस्त कामगिरी केली आहे. पहिल्या हंगामात त्यांनी आयपीएल स्पर्धा जिंकली असून, दुसऱ्या हंगामात ते फायनलपर्यंत पोहोचले होते. पण दुर्दैवाने चेन्नईने त्यांच्या तोंडचा घास हिरावून घेतला होता. त्यामुळे या हंगामात पुन्हा एकदा गुजरात टायटन्स कामगिरीचं पुनरागमन करणार का याकडे सर्वांचं लक्ष असेल. 

गुजरातचे सामने कधी आहेत?

वेळापत्रकानुसार, गुजरात एकूण 5 सामने खेळणार आहे. यामधील पहिला सामना 24 मार्चला मुंबई इंडियन्सविरोधात होणार आहे. अहमदाबादमध्ये हा सामना होणार आहे. जाणून घ्या गुजरात टायटन्सचं संपूर्ण वेळापत्रक -

1) गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स: 24 मार्च, रविवार, संध्याकाळी 6.30 वाजता, अमहदाबाद
2) गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज - 26 मार्च, संध्याकाळी 6.30 वाजता, चेन्नई
3) गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद - 26 मार्च, संध्याकाळी 6.30 वाजता, अमहदाबाद
4) गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्स इलेव्हन- 4 एप्रिल, संध्याकाळी 6.30 वाजता, अमहदाबाद
5) गुजरात टायटन्स विरुद्ध लखनऊ सुपरजायंट्स - 7 एप्रिल, संध्याकाळी 6.30 वाजता, लखनऊ

गुजरातसमोर आव्हानांचा डोंगर

पण यावेळी गुजरात संघासमोर अनेक आव्हानं आहेत. पहिल्या दोन हंगामात संघाचं यशस्वी नेतृत्व करणारा हार्दिक पांड्या आता कर्णधारपदी नाही. तो पुन्हा एकदा मुंबई इंडियन्स संघात सामील झाली आहे. त्याच्या जागी आता नवख्या शुभमन गिलकडे नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. दुसरीकडे मोहम्मद शमीच्या घोट्याला दुखापत झाली असल्याने सर्जरी करावी लागणार आहे. यामुळे तो आयपीएल हंगामाला मुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुजरात टायटन्सला अनेक अडथळे पार करावे लागणार आहेत. 

उर्वरित वेळापत्रक आधी

आयपीएल अध्यक्ष अरुण धुमाळ यांनी याआधीच आयपीएल 22 मार्चपासून सुरु होईल असं जाहीर केलं होतं. आयपीएलचं वेळापत्रक टप्प्याटप्याने जाहीर केलं जाणार आहे.