इंग्लंडच्या खेळाडूनं मर्यादा ओलांडली, भारतीय खेळाडूला कुत्रा म्हणाला

भारताविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये इंग्लंडचा २-१नं विजय झाला आहे. 

Updated: Jul 18, 2018, 07:59 PM IST
इंग्लंडच्या खेळाडूनं मर्यादा ओलांडली, भारतीय खेळाडूला कुत्रा म्हणाला title=

लंडन : भारताविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये इंग्लंडचा २-१नं विजय झाला आहे. पण सीरिज जिंकल्यानंतर आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे. इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू ग्रॅम स्वाननं कॉमेंट्री करताना युझवेंद्र चहलविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं. भारत आणि इंग्लंडमधल्या लॉर्ड्सवर झालेल्या दुसऱ्या वनडेमध्ये हा प्रकार घडला. या मॅचमध्ये इंग्लंडनं भारतापुढे विजयासाठी ३२२ रनचं आव्हान ठेवलं होतं. ४९ व्या ओव्हरला कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल ही भारताची शेवटची जोडी बॅटिंग करत होती. यावेळी चहलनं थर्डमॅनच्या दिशेनं बॉल मारून रन काढण्याचा प्रयत्न केला. पण कुलदीप यादवनं चहलला परत पाठवलं. यानंतर स्वत:ची विकेट वाचवण्यासाठी चहल उडी मारून क्रिजमध्ये आला. हा सगळा गोंधळ सुरु असताना ग्रॅम स्वान कॉमेंट्री बॉक्समध्ये होता.

चहल हा अकराव्या क्रमांकाच्या खेळाडूला साजेसा असाच खेळ करतोय. हातातल्या बॅटचं काय सुरू आहे याची कल्पनाही त्याला नाही. कुत्रा जसा ताटलीला पकडण्यासाठी पळतो तसा चहल पळत आहे, असं स्वान म्हणाला. स्वानच्या या वक्तव्यावरून त्याच्यावर भारतीय क्रिकेट फॅन्सनी टीका केली आहे.

याआधी २०११ सालीही भारताच्या इंग्लंड दौऱ्यात असाच वाद झाला होता. इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेन भारतीय फिल्डरना गाढवं म्हणाला होता. 

पाहा काय म्हणाला ग्रॅम स्वान