गंभीरच नाही तर या खेळाडूंनाही आयपीएलदरम्यान सोडावं लागलं कर्णधारपद

आयपीएलच्या या मोसमामध्ये खराब कामगिरी केल्यामुळे दिल्लीचा कर्णधार गौतम गंभीरनं राजीनामा दिला आहे.

Updated: Apr 25, 2018, 10:30 PM IST
गंभीरच नाही तर या खेळाडूंनाही आयपीएलदरम्यान सोडावं लागलं कर्णधारपद  title=

नवी दिल्ली : आयपीएलच्या या मोसमामध्ये खराब कामगिरी केल्यामुळे दिल्लीचा कर्णधार गौतम गंभीरनं राजीनामा दिला आहे. यामागे फ्रॅन्चायजीचा कोणताही दबाव नाही. माझी जबाबदारी मला पूर्णपणे निभावता आलेली नाही म्हणून मी पदावरून पायउतार होत आहे, असं गंभीर म्हणाला आहे. आयपीएलच्या दरम्यान कर्णधारपद सोडण्याची ही काही पहिली वेळ नाही.

व्ही.व्ही.एस.लक्ष्मण

२००८ सालच्या सुरुवातीलाच डेक्कन चार्जर्सचा कर्णधार व्ही.व्ही.एस. लक्ष्मणला कर्णधारपद सोडावं लागलं होतं. या निर्णयानंतरही टीमच्या कामगिरीमध्ये कोणतीही सुधारणा झाली नाही. पॉईंट्स टेबलमध्ये टीम शेवटच्या क्रमांकावर राहिली.

केव्हन पीटरसन

पुढच्याच वर्षी २००९ साली खराब कामगिरीमुळे केव्हिन पीटरसननं बंगळुरूचं कर्णधारपद सोडलं. पीटरसनऐवजी अनिल कुंबळेकडे टीमचं नेतृत्व आलं. कुंबळेच्या नेतृत्वात टीम फायनलमध्ये पोहोचली.

डॅनिअल व्हिटोरी

२०१२ साली पुन्हा एकदा बंगळुरूनं कर्णधार बदलला. डेनियल व्हिटोरीऐवजी विराट कोहलीला कर्णधार बनवण्यात आलं. त्यावर्षी बंगळुरूची टीम पाचव्या क्रमांकावर राहिली.

कुमार संगकारा

२०१२ साली डेक्कन चार्जसच्या खराब कामगिरीमुळे कुमार संगकारा पायउतार झाला. संगकाराऐवजी कॅमरुन व्हाईटला कॅप्टन बनवण्यात आलं. तरी टीम स्पर्धेमध्ये ९व्या क्रमांकावर राहिली.

रिकी पॉटिंग

२०१३ साली मुंबईच्या खराब कामगिरीमुळे रिकी पॉटिंगचं कर्णधारपद गेलं. पॉटिंगऐवजी रोहित शर्माला मुंबईचं कर्णधार बनवण्यात आलं. याचवर्षी पहिल्यांदाच मुंबईनं आयपीएल जिंकली.

शिखर धवन

२०१४ साली हैदराबादच्या टीमनं शिखर धवनला कर्णधार बनवलं. पण यानंतर वेस्ट इंडिजच्या डॅरेन सामीला कर्णधारपद देण्यात आलं. या बदलानंतरही हैदराबादची कामगिरी सुधारली नाही. यावर्षी हैदराबादची टीम सहाव्या क्रमांकावर राहिली.

शेन वॉटसन

२०१५ साली राजस्थाननं शेन वॉटसनऐवजी स्टीव्ह स्मिथला कर्णधार बनवलं. तरीही राजस्थानचा फारसा फायदा झाला नाही.

डेविड मिलर

२०१६ साली पंजाबनं डेविड मिलरऐवजी मुरली विजयला कर्णधार बनवलं. या बदलानंतरही पंजाबचा फायदा झाला नाही. यावर्षी टीम शेवटच्या क्रमांकावर राहिली. यावर्षी मुरली विजय चेन्नईच्या टीमकडून खेळत आहे.