नवी दिल्ली : क्रिकेट टीममध्ये क्रिकेटरच्या मुलाचं सिलेक्शन अगदी सहज होतं असा अनेकांचा समज असतो. मात्र, एका माजी क्रिकेटरच्या मुलाचं टीममध्ये सिलेक्शन न झाल्यानं त्याने चक्क आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
पाकिस्तानचा माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटर आमिर हानिफ याच्या मुलाने 'अंडर-१९ टीम'मध्ये सिलेक्शन न झाल्याने आत्महत्या केली आहे.
आमिर हानिफ यांचा मोठा मुलगा मोहम्मद जारयाब याने सोमवारी आत्महत्या केली. जिओ न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, 'अंडर-१९ टीम'मध्ये निवड न झाल्याने मोहम्मद जारयाब ने आत्महत्या केली आहे.
रिपोर्ट्सनुसार, मोहम्मद जारयाब याने लाहोरमध्ये एक अंडर-१९ टूर्नामेंट खेळली होती. मात्र, दुखापतग्रस्त झाल्याने त्याला विश्रांती देण्यात आली. दुखापतीचं कारण देत त्याला घरी पाठवण्यात आलं होतं. पण मोहम्मद जाण्यास तयार नव्हता. त्यावेळी
पुन्हा तुला टीममध्ये घेण्यात येईल असं आश्वासन देण्यात आलं होतं. पण, नंतर वय जास्त असल्याचं कारण देत त्याची टीममध्ये निवड केली नाही.
हानिफ यांनी प्रसारमाध्यमांसोबत बोलताना म्हटलं की, "अंडर-१९ क्रिकेट टीमच्या कोचमुळेच माझ्या मुलाने आत्महत्या केली."