कोलकाता : श्रीलंकेविरुद्धची पहिली टेस्ट रोमहर्षकरित्या ड्रॉ झाली आहे. शेवटच्या ओव्हरपर्यंत या मॅचमध्ये रोमांच पाहायला मिळाला. भारतानं ठेवलेल्या २३१ रन्सचा पाठलाग करताना श्रीलंकेनं शेवटच्या इनिंगमध्ये ७५/७ एवढा स्कोअर केला. शेवटच्या इनिंगमध्ये भुवनेश्वर कुमारनं ४, मोहम्मद शमीनं २ आणि उमेश यादवनं १ विकेट घेतली. खराब लाईटमुळे अखेर खेळ थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला.
पाचव्या दिवसाची सुरुवात १७१/१ अशी केल्यानंतर भारतानं दुसऱ्या इनिंगमध्ये ३५२/८ वर डाव घोषित केला. विराट कोहलीच्या नाबाद १०४ रन्स, धवनच्या ९४ आणि के.एल.राहुलच्या ७९ रन्समुळे भारतानं श्रीलंकेपुढे २३१ रन्सचं आव्हान ठेवलं.
भारतानं पहिल्या इनिंगमध्ये १७२ रन्स केल्यानंतर श्रीलंकेनं २९४ रन्स करून पहिल्या इनिंगमध्ये महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. पण पावसानं पहिल्या दिवसापासूनच व्यतय आणल्यामुळे ही मॅच अनिर्णित राहिली.