एबी डिव्हिलियर्सनंतर फॅप डुप्लेसिसचेही निवृत्तीचे संकेत

एबी डिव्हिलियर्सनंतर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फॅप डुप्लेसिसनं निवृत्तीचे संकेत दिले आहेत. 

Updated: Nov 17, 2018, 09:58 PM IST
एबी डिव्हिलियर्सनंतर फॅप डुप्लेसिसचेही निवृत्तीचे संकेत  title=

ब्रिस्बेन : दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज खेळाडू एबी डिव्हिलियर्सच्या निवृत्तीनंतर त्यांचा कर्णधार फॅप डुप्लेसिसनंही निवृत्तीचे संकेत दिले आहेत. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपनंतर आपण संन्यास घेऊ शकतो, असं डुप्लेसिस म्हणाला. १८ ऑक्टोबर २०२० ते १५ नोव्हेंबर २०२० या दरम्यान टी-२० वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. याआधी मे महिन्यामध्ये एबी डिव्हिलियर्सनं निवृत्तीची घोषणा केली होती. २०२० सालचा वर्ल्ड कप खेळणं हे माझं लक्ष्य आहे. यासाठी आता फार कालावधी राहिलेला नाही. हा वर्ल्ड कप कदाचीत माझ्यासाठी शेवटची आंतरराष्ट्रीय स्पर्धा असू शकते, असं वक्तव्य डुप्लेसिसनं केलं आहे.

घरगुती टी-२० लीगमुळे टी-२० वर्ल्ड कपशिवाय दुसऱ्या स्पर्धांमध्ये सर्वश्रेष्ठ टीम घेऊन मैदानात उतरणं मुश्कील आहे. यावर आयसीसीनं लक्ष दिलं पाहिजे, असं डुप्लेसिसला वाटतं. दुसऱ्या टीमसोबतही असंच होतंय. बहुतेकवेळा मजबूत टीम मैदानात उतरत नाही. रसिकांना मात्र दिग्गज खेळाडूंना मैदानात बघायचं असतं. पण दिग्गज खेळाडू फक्त टी-२० वर्ल्ड कपसाठीच मैदानात येतात, अशी प्रतिक्रिया डुप्लेसिसनं दिली.

फॅप डुप्लेसिस हा ३४ वर्षांचा आहे. २०१४ आणि २०१६ सालच्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये डुप्लेसिसनं दक्षिण आफ्रिकेचं नेतृत्व केलं. डुप्लेसिसची आंतरराष्ट्रीय कारकिर्दही फक्त ७ वर्षांची आहे. त्यानं २०११ साली पहिली वनडे आणि २०१२ साली पहिली टेस्ट मॅच आणि पहिली टी-२० मॅच खेळली होती. आत्तापर्यंत डुप्लेसिसनं ५४ टेस्ट, १२४ वनडे आणि ४१ टी-२० खेळल्या आहेत. आयपीएलमध्ये तो चेन्नईच्या टीमकडून खेळतो.