पैशांची हाव दक्षिण आफ्रिकेला डुबवणार? कॅप्टन डुप्लेसिसला भीती

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टला सुरुवात झाली आहे. ३ टेस्ट मॅचची ही सीरिज भारतानं आधीच २-०नं गमावली आहे. 

Updated: Jan 24, 2018, 05:23 PM IST
पैशांची हाव दक्षिण आफ्रिकेला डुबवणार? कॅप्टन डुप्लेसिसला भीती title=

जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टला सुरुवात झाली आहे. ३ टेस्ट मॅचची ही सीरिज भारतानं आधीच २-०नं गमावली आहे. केप टाऊनमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये ७२ रन्सनी तर दुसऱ्या टेस्टमध्ये १३५ रन्सनी भारताचा पराभव झाला होता. आता तिसऱ्या टेस्टमध्ये भारत सन्मानासाठी मैदानात उतरेल. तर दक्षिण आफ्रिकेकडे पहिल्यांदाच भारतला ३-०नं हरवून व्हाईटवॉश करण्याची संधी आहे.

दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन फॅप डुप्लेसिसला मात्र वेगळीच चिंता सतावत आहे. या आठवड्याच्या शेवटी होणाऱ्या आयपीएल लिलावामुळे दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंचं मन विचलित होईल अशी भीती डुप्लेसिसनं बोलून दाखवली आहे.

२७ आणि २८ जानेवारीला आयपीएलसाठी खेळाडूंचा लिलाव होणार आहे. हे दोन दिवस भारत-दक्षिण आफ्रिका टेस्टचे शेवटचे दोन दिवस आहेत. आयपीएलचा लिलाव होईल तेव्हा खेळाडू मैदानात असतील. अशावेळी खेळाडूंकडे फोन नसतील त्यामुळे कोणत्या खेळाडूवर किती बोली लागली याची माहिती खेळाडूंना मिळणार नाही. याचा परिणाम खेळावर होऊ शकतो, असा संशय डुप्लेसिसनं व्यक्त केला आहे.

यंदाच्या आयपीएल लिलावामध्ये ही टेस्ट मॅच खेळणाऱ्या खेळाडूंपैकी डुप्लेसिस, क्विंटन डीकॉक, हाशीम आमला, कगीसो रबाडा, लुंगी एनगिडी, डीन एल्गार, मॉर्नी मॉर्कल आणि वर्नन फिलँडरचा समावेश आहे.