Explained: T-20 वर्ल्ड कप जिंकवून देणाऱ्या हार्दिकला उपकर्णधारपदावरुन का काढलं? गिलची वर्णी कशी लागली?

Explained Why Hardik Pandya Replaced By Shubman Gill: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने घेतलेला हा निर्णय हार्दिकच्या चाहत्यांना धक्का देणारा असला तरी यामागील कारणं समजून घेतली पाहिजेत

स्वप्निल घंगाळे | Updated: Jul 19, 2024, 08:45 AM IST
Explained: T-20 वर्ल्ड कप जिंकवून देणाऱ्या हार्दिकला उपकर्णधारपदावरुन का काढलं? गिलची वर्णी कशी लागली? title=
हार्दिक पंड्याला उपकर्णधारपदावरुनही काढलं

Explained Why Hardik Pandya Replaced By Shubman Gill: भारतीय कर्णधार रोहित शर्माने टी-20 मधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर हार्दिक पंड्या भारताचा कर्णधार होणार असं मानलं जात होतं. हार्दिककडे धुरा सोपवण्यासंदर्भातील हलचालीही सुरु असल्याच्या बातम्या आल्या. त्यातही हार्दिकने टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये उत्तम कामगिरी करत जवळपास आपलं नाव कर्णधार म्हणून निश्चित होईल याची काळजी घेतली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अंतिम सामन्यामध्ये भारतीय संघाचा उपकर्णधार असलेल्या हार्दिक पंड्याने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर संघाला दुसऱ्यांदा चषक मिळवून देण्यात मोलाचा हातभार लावला. या सामन्यानंतर रोहित शर्माने टी-20 अंतरराष्ट्रीय सामन्यांमधून निवृत्ती जाहीर केली. हार्दिकच रोहितचा वारस असेल असं मानलं जात होतं. हार्दिकने यापूर्वीच इंडियन प्रिमिअर लीगमध्ये मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी विराजमान होत रोहितची जागा घेतली होती. त्याचप्रमाणे तो भारतीय संघाचेही नेतृत्व करेल असं मानलं जात होतं. मात्र घडलं भलतेच.

कर्णधार झाला सूर्या? कामगिरी कशी?

टी-20 वर्ल्ड कपनंतर राहुल द्रविडने भारतीय संघाचं प्रशिक्षक पद सोडल्यानंतर गौतम गंभीरकडे प्रशिक्षकपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. गंभीरनेच हार्दिक कर्णधार म्हणून योग्य नसल्याचं निवड समितीला पटवून दिल्याचं सांगितलं जात आहे. तसेच गौतम गंभीरचे सूर्यकुमार यादवबरोबर असलेलं खास कनेक्शन पाहता कर्णधारपदाची माळ सूर्यकुमारच्या गळ्यात पडली. श्रीलंकेच्या दौऱ्यासाठी सूर्यकुमारकडे भारतीय संघाचं कर्णधारपद देण्यात आलं आहे. सूर्यकुमारने कर्णधार म्हणून आतापर्यंत समाधानकारक कामगिरी केली आहे. सूर्यकुमारने आतापर्यंत 7 टी-20 सामन्यांमध्ये भारताचं नेतृत्व केलं आहे. त्यापैकी 5 सामने भारताने जिंकले असून 2 सामने गमावले आहेत. सूर्याने ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेसारख्या तगड्या संघांविरुद्ध कर्णधारपद भूषवलं आहे.

हार्दिकचं उपकर्णधारपदही गेलं

गुरुवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच बीसीसीआयने श्रीलंकन दौऱ्यासाठी दोन वेगवेगळे भारतीय संघ जाहीर केले. एकदिवसीय सामन्यांसाठीचा संघ आणि टी-20 सामन्यांसाठीचा संघ जाहीर करण्यात आला. यामध्ये टी-20 संघाचं कर्णधारपद सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आलं असून एकदिवसीय सामन्यांसाठी रोहित शर्माच कर्णधार असणार आहे. हार्दिक पंड्याचं केवळ कर्णधारपद नाकारलं आहे असं नाही तर त्याच्याकडून उपकर्णधारपदाची जबाबदारीही काढून घेण्यात आली आहे. हार्दिक पंड्याऐवजी उपकर्णधारपद शुभमन गिलकडे सोपवण्यात आलं आहे. शुभमन गिल हा एकदिवसीय सामने आणि टी-20 सामन्यांमध्ये भारताचा उपकर्णधार असेल. 

शुभमनची उत्तम कामगिरी

झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेमध्ये शुभमनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 4-1 असा विजय मिळवला. गिलने भारताच्या दुय्यम संघाचं प्रतिनिधित्व केलं ज्यामध्ये अनेक नामांकित खेळाडू नव्हते. व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांच्या प्रशिक्षणाखाली गिलच्या संघाने पाचपैकी 4 सामने जिंकण्याची कामगिरी केली. गिल हा 2023 पासून 50 ओव्हरच्या क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाच्या यादीमध्ये दुसऱ्या स्थानी आहे. टी-20 चं कर्णधारपद गमावलेल्या हार्दिकने उपकर्णधारपदही गमावलं आहे. हार्दिक पंड्या एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार नाही.

नक्की वाचा >> गंभीरसमोर BCCI ला नमतं घ्यावच लागलं! साधं कॉन्ट्रॅक्टही न केलेला खेळाडू टीम इंडियात

हार्दिकची माघार

हार्दिकने खासगी कारण देत या मालिकेमधून माघार घेतली आहे. हार्दिक पंड्यांच्या प्रकृतीसंदर्भातील बऱ्याच समस्या आहेत. मध्यंतरी तो बराच काळ या सामस्यांमुळे मैदानाबाहेर होता. वर्कलोड मॅनेजमेंटमध्येही हार्दिकने काही गोंधळ घातल्याचं निवड समितीचं मत तयार झालं आहे. त्यामुळेच त्यांनी हार्दिक पंड्याऐवजी सूर्यकुमार यादवकडे कर्णधारपद सोपवलं आहे. हार्दिकने तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये आणि 16 टी-20 सामन्यांमध्ये भारताचं नेतृत्व केलं आहे. मागील वर्षी झालेल्या एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान हार्दिकच्या घोट्याला जखम झाली होती. हार्दिकने त्यानंतर स्पर्धा अर्ध्यात सोडली होती. हार्दिक त्यानंतर थेट आयपीएलच्या माध्यमातून क्रिकेटच्या मैदानात आला होता. 

नवा संघ बांधण्याची तयारी

गौतम गंभीरने संघाच्या प्रशिक्षकपदाचं नेतृत्व स्वीकारल्यानंतर त्याने 2026 च्या टी-20 वर्ल्ड कपसाठी संघबांधणीच्या दृष्टीने श्रीलंकेच्या मालिकेमधून पहिलं पाऊल टाकल्याचं बोललं जात आहे. काही बातम्यांनुसार आता 2026 च्या वर्ल्ड कपपर्यंत सूर्यकुमारकडेच भारतीय टी-20 संघाचं कर्णधारपद कायम राखलं जाऊ शकतं.