नॉटिंगहम : तिसऱ्या टेस्टमध्ये भारतानं ठेवलेल्या ५२१ रनचा पाठलाग करताना इंग्लंडची अवस्था आणखी वाईट झाली आहे. चौथ्या दिवसाच्या लंचपर्यंत इंग्लंडनं ४ विकेट गमावल्या आहेत. त्यामुळे ही टेस्ट भारत आजच जिंकण्याची शक्यता आहे. चौथ्या दिवसाची सुरुवात इंग्लंडनं २३-० अशी केली होती. पण दिवसाच्या सुरुवातीलाच ईशांत शर्मानं इंग्लंडला दोन धक्के दिले. ईशांतनं कूकला १७ रनवर आणि केटन जेनिंग्सला १३ रनवर पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. यानंतर बुमराहनं जो रूटची(१३) आणि मोहम्मद शमीनं ओली पोपची विकेट घेतली.
तिसऱ्या दिवशी भारतानं ३५२-७ वर डाव घोषित केला. यामुळे इंग्लंडला विजयासाठी तब्बल ५२१ रनचं आव्हान मिळालं. दुसऱ्या इनिंगमध्ये भारताकडून कर्णधार विराट कोहलीनं शानदार शतक पूर्ण केलं. टेस्ट क्रिकेटमधलं कोहलीचं हे २३वं शतक होतं. विराट कोहली १९७ बॉलमध्ये १०३ रन करून आऊट झाला. विराटच्या या खेळीमध्ये १० फोरचा समावेश होता. भारताच्या बॉलिंगच्या वेळी इंग्लंडच्या ५ विकेट घेणाऱ्या हार्दिक पांड्यानं बॅटिंग करताना ५२ बॉलमध्ये नाबाद ५२ रन केले. तर चेतेश्वर पुजारा ७२ रन करून आऊट झाला.
पाच टेस्ट मॅचच्या या सीरिजमध्ये भारत ०-२नं पिछाडीवर आहे. त्यामुळे सीरिजमधलं आव्हान कायम ठेवण्यासाठी भारताला ही टेस्ट मॅच जिंकणं आवश्यक आहे.