लंडन : चौथ्या दिवसाच्या सुरुवातीलाच इंग्लंडनं ३९६ रनवर डाव घोषित केला आहे. यामुळे इंग्लंडकडे आता २८९ रनची भक्कम आघाडी आहे. भारताला १०७ रनवर ऑल आऊट केल्यानंतर इंग्लंडची अवस्था १३१-५ अशी झाली होती. पण जॉनी बेअरस्टो आणि क्रिस वोक्सच्या पार्टनरशीपमुळे इंग्लंडनं मॅचमध्ये कमबॅक केलं. जॉनी बेअरस्टो काल ९३ रनवर आऊट झाला. तर क्रिस वोक्स १३७ रनवर नाबाद राहिला. सॅम कुरननं क्रिस वोक्सबरोबर महत्त्वाची पार्टनरशीप केली. चौथ्या दिवसाच्या सुरुवातीला सॅम कुरन ४० रनवर आऊट झाला. यानंतर इंग्लंडचा कर्णधार जो रुटनं डाव घोषित केला. भारताकडून मोहम्मद शमीनं ३, हार्दिक पांड्यानं ३ आणि इशांत शर्मानं १ विकेट घेतली.
इंग्लंडकडे आता २८९ रनची आघाडी असल्यामुळे आता भारताला टेस्ट मॅच वाचवण्यासाठीच खेळावं लागणार आहे. बर्मिंगहममध्ये झालेल्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा ३१ रननी पराभव झाला होता. या मॅचमध्येही भारताला पराभवाला सामोरं जावं लागलं तर सीरिजमध्ये कमबॅक करणं अवघड होणार आहे.