शेवटच्या ओव्हरमधल्या गोंधळामुळे पराभव? पंड्या, द्रविड ओरडून ओरडून सांगत होते पण चहलने...

Dravid Hardik Chahal Ind Vs WI: वेस्ट इंडिजविरुद्धची दुसरा टी-20 सामना आज खेळवला जाणार आहे. मात्र पहिल्या सामन्यातील पराभवासंदर्भात शेवटच्या ओव्हरमधील एका गोंधळाची सध्या चर्चा सुरु असून हा गोंधळ झाला नसता तर भारत जिंकला असता का असा प्रश्न विचारला जातोय.

स्वप्निल घंगाळे | Updated: Aug 6, 2023, 09:52 AM IST
शेवटच्या ओव्हरमधल्या गोंधळामुळे पराभव? पंड्या, द्रविड ओरडून ओरडून सांगत होते पण चहलने... title=
सामन्याच्या शेवटच्या ओव्हरमध्ये गोंधळ

Dravid Hardik Chahal Ind Vs WI: भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहल हा त्याच्या गोलंदाजीसाठी ओळखला जात असला तरी त्याची फलंदाजी म्हणावी तितकीशी खास नाही. याचा अंदाज त्याच्या फलंदाजीसंदर्भातील आकडेवारीवरुनच बांधता येतो. लेग स्पीनर असलेल्या चहलने आतापर्यंत टी-20 करिअरमध्ये केवळ 6 धावा केल्या आहेत. चहलच्या नावावर आंतरराष्ट्रीय टी-20 सामने, फर्स्ट क्लास क्रिकेट, लिस्ट ए सामने मिळून 802 धावा आहेत. त्यामुळेच त्याच्या फलंदाजीबद्दल संघ व्यवस्थापन साशंक असलं तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही. मात्र असं असतानाही भारत विरुद्ध वेस्ट इंडिजदरम्यान खेळवण्यात आलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात चहल बराच लवकर फलंदाजीसाठी मैदानात आला. यासंदर्भातील एक रंजक किस्सा आता समोर आला आहे. 

चहल आला पण...

ब्रायन लारा स्टेडिमवर झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यामध्ये भारताचा पराभव झाला. रोमारियो शेफर्डने 20 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर कुलदीप यादवला बोल्ड केलं. कुलदीप बोल्ड झाला तेव्हा भारताला 5 चेंडूंमध्ये 10 धावांची गरज होती. भारताच्या हाती 2 विकेट्स होत्या. अशदीप सिंगने 19 व्या षटकामध्ये 2 चौकार लगावून भारताच्या विजयाच्या आशा कायम ठेवल्या होत्या. मात्र तो नॉनस्टाइकर्स एण्डला होता. कुलदीप बाद झाल्यानंतर तो पव्हेलियनकडे परत जात असतानाच समोरुन चहल फलंदाजीसाठी अगदी पॅड वगैरे घालून मैदानात उतरण्याच्या तयारी होता. मात्र त्याचवेळी प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार हार्दीक पंड्या यांना पदार्पण करणारा मुकेश कुमार हा फलंदाजीला जावा असं वाटतं होतं.

डगआऊटमधून आरडाओरड

डगआऊटमधून द्रविड आणि हार्दिकच्या आरडाओरडीचा आवाज ऐकल्यानंतर चहलने अगदी मैदानात प्रवेश करताना स्वत:ला रोखलं आणि तो मागे फिरला. त्यानंतर मुकेशने मैदानात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला पण त्याला रोखण्यात आलं. क्रिकेटच्या नियमांनुसार एकदा फलंदाजीसाठी फलंदाजाने मैदानात पाऊल ठेवलं की त्याला पुन्हा मागे जाता येत नाही. एकदा मैदानात आलेल्या फलंदाजाला परत पाठवून त्याच्याऐवजी दुसऱ्या फलंदाजाला पाठवता येत नाही. त्यामुळे चहलच 10 व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. 

एका चेंडूत हव्या होत्या 6 धावा

चहलने पहिल्या चेंडूत एक धाव घेतली. त्यानंतर अशरदीपला चौकार लगावता आले नाहीत. तो एक चेंडू शिल्लक असताना पाचव्या चेंडूवर धावबाद झाला. शेवटच्या चेंडूवर मुकेश कुमारला 6 धावा करायच्या होत्या. मात्र त्याला एकच धाव घेता आली आणि वेस्ट इंडिजने सामना 4 धावांनी जिंकत मालिकेत 1-0 ने विजय मिळवला. 

गोंधळ टाळता आला असता

मुकेश चहलच्या आधी आला असता तरी विशेष काही फरक पडला असता असं म्हणता येणार नाही. कारण मुकेश उत्तम फलंदाज असल्याचं आकडेवारी तरी दर्शवत नाही. मात्र भारतीय संघ व्यवस्थापनाला घडलेला गोंधळ योग्य नियोजनाने नक्कीच टाळता आला असता.