हार्दिक पांड्या ऑल राऊंडर नाही, हरभजनची सडकून टीका

भारताचा क्रिकेटपटू हरभजन सिंगनं हार्दिक पांड्यावर सडकून टीका केली आहे

Updated: Aug 15, 2018, 05:52 PM IST
हार्दिक पांड्या ऑल राऊंडर नाही, हरभजनची सडकून टीका title=

मुंबई :  आयपीएलमध्ये एकेकाळी हार्दिक पांड्या आणि हरभजन सिंग मुंबईच्या टीमकडून खेळायचे. पण आता हरभजन सिंगनं त्याचा माजी सहकारी हार्दिक पांड्यावर सडकून टीका केली आहे. हार्दिक पांड्याला ऑल राऊंडर म्हणू नका, असं वक्तव्य हरभजननं केलं आहे. इंग्लंडविरुद्धच्या दोन्ही टेस्ट मॅचमध्ये पांड्याला बॅटिंग आणि बॉलिंगमध्ये चमक दाखवता आली नाही. ४ इनिंगमध्ये पांड्यानं ९० रन केल्या आणि फक्त ३ विकेट घेतल्या आहेत. पांड्यानं रन केल्या नाहीत आणि त्याला बॉलिंग देण्यात कर्णधाराला विश्वास दिसत नाही. जर इंग्लंडमधल्या वातावरणातही पांड्याला बॉलिंग जमत नसेल तर त्याचं भारतीय टीममधील अस्तित्व धोक्यात येईल, अशी चिंता हरभजननं व्यक्त केली आहे.

हरभजननं हार्दिकच्या कामगिरीची तुलना इंग्लंडचे ऑल राऊंडर बेन स्टोक्स, सॅम कुरन आणि क्रिस वोक्सशी केली आहे. इंग्लंडच्या ऑल राऊंडरनी उल्लेखनीय कामगिरी केल्याचं हरभजन म्हणाला. हार्दिकचा उल्लेख ऑल राऊंडर असा करू नका कारण ऑल राऊंडर हा बॅटिंग आणि बॉलिंगमध्ये उल्लेखनीय कामगिरी करतो. पहिल्या टेस्टमध्ये स्टोक्स आणि कुरननं आणि दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये क्रिस वोक्सनं इंग्लंडला जिंकवून दिलं. पांड्याकडूनही हीच अपेक्षा होती. एका रात्रीमध्ये कोणी कपिल देव होत नाही असा टोला हरभजननं हाणला.

पांड्यानं आत्तापर्यंत ९ टेस्ट मॅच खेळल्या आहेत. यामध्ये ३२.७१ च्या सरासरीनं त्यानं ४५८ रन केले यामध्ये एक शतक आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे.

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा ३१ रननी पराभव झाला. तर दुसरी टेस्ट भारताला इनिंग आणि १५९ रननं गमवावी लागली. ५ टेस्ट मॅचच्या या सीरिजमध्ये इंग्लंड २-०नं आघाडीवर आहे. या सीरिजची तिसरी टेस्ट १८ ऑगस्टपासून सुरु होणार आहे.