Cricket World Cup 2019: निवड समिती अध्यक्ष म्हणतात; म्हणून पंतऐवजी कार्तिकची निवड

ऋषभ पंतपुढे दिनेश कार्तिकचा अनुभव उजवा ठरला. 

Updated: Apr 15, 2019, 05:48 PM IST
Cricket World Cup 2019: निवड समिती अध्यक्ष म्हणतात; म्हणून पंतऐवजी कार्तिकची निवड title=

मुंबई : वर्ल्ड कपसाठीची भारतीय टीमची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. या टीममध्ये फारसे मोठे बदल करण्यात आलेले नाहीत. पण अतिरिक्त विकेट कीपर म्हणून निवड समितीने ऋषभ पंतऐवजी अनुभवी दिनेश कार्तिकला झुकतं माप दिलं आहे. 

 

 

वनडे क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत ऋषभ पंतला फक्त ५ मॅच खेळण्याची संधी मिळाली आहे. यामध्ये त्याला चमकदार कामगिरी करता आलेली नाही. या ५ वनडेमध्ये पंतने फक्त ९३ रन केल्या आहेत. यामध्ये पंतचा सर्वाधिक स्कोअर ३६ रन आहे. पण तरीही पंतकडे असलेला एक्स फॅक्टर आणि आक्रमक खेळामुळे एकहाती मॅच फिरवण्याची खुबी, यामुळे पंतला संधी मिळेल असं बोललं जात होतं. पण ऋषभ पंतपुढे दिनेश कार्तिकचा अनुभव उजवा ठरला. 

निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद पत्रकार परिषदेत म्हणाले की, 'दिनेश कार्तिकला पंतपेक्षा विकेट कीपिंगचा जास्त अनुभव आहे. त्यामुळे ऋषभ पंतऐवजी कार्तिकला प्राधान्य देण्यात आलं. बॅटिंगबरोबरच विकेट किपिंग देखील फार महत्त्वाचं आहे. या कारणामुळे आम्ही टीममध्ये दिनेश कार्तिकला संधी दिली, अन्यथा पंतला देखील संधी मिळाली असती'.

ऋषभच्या तुलनेत कार्तिक फार अनुभवी खेळाडू आहे. दिनेश कार्तिकने भारताचे  ९१ मॅचमध्ये प्रतिनिधीत्व केले आहे. त्याने यापैकी ७७ इनिंगमध्ये ७३ च्या स्ट्राईक रेटने १७३८ रन केल्या आहेत. कार्तिकने इंग्लंड विरुद्ध २००४ साली वनडे पदार्पण केले होते.