मुंबई : अंडर १९ क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारतानं पपुआ न्यूगिनीचा १० विकेट्सनं पराभव करून क्वार्टर फायनलमध्ये धडक मारली आहे. कॅप्टन पृथ्वी शॉच्या ५७ रन्स आणि अनुकूल रॉयनं घेतलेल्या ५ विकेटमुळे या मॅचमध्ये भारताचा शानदार विजय झाला.
या मॅचमध्ये भारतानं टॉस जिंकून पहिले पपुआ न्यूगिनीला बॅटिंगसाठी बोलावलं. पपुआ न्यूगिनीचा फक्त ६४ रन्सवर ऑल आऊट झाल्यावर भारतानं एकही विकेट न गमावता आठ ओव्हरमध्येच मॅच संपवली. दोन मॅच जिंकल्यामुळे भारताकडे आता ४ पॉईंट्स आहेत. भारताचा पुढचा सामना १९ जानेवारीला झिम्बाब्वेविरुद्ध होणार आहे.
भारताच्या या विजयामध्ये मोलाचं योगदान दिलं ते स्पिनर अनुकूल रॉयनं. अनुकूलनं ६.५ ओव्हरमध्ये १४ रन्स देऊन ५ विकेट घेतल्या. तर फास्ट बॉलर शिवम मावीनं दोन आणि कमलेश नागरकोटी, अर्शदीप सिंगला प्रत्येकी एक विकेट मिळाली.
अनुकूल रॉय डावखुरा स्पिनरबरोबरच बॅट्समनही आहे. अनुकूल बिहारच्या समस्तीपूरमध्ये राहतो. पण बिहारमध्ये क्रिकेटचं भविष्य नसल्यामुळे अनुकूल झारखंडमध्ये क्रिकेट खेळायला गेला. चायबासा जिल्ह्यामध्ये पश्चिम सिंहभूममधून अनुकूलनं क्रिकेट खेळायला सुरुवात केली.
स्थानिक पातळीवर शानदार प्रदर्शन केल्यामुळे अनुकूलची झारखंडच्या अंडर १९ क्रिकेट टीमचा कॅप्टन म्हणून निवड झाली. यानंतर अनुकूलला इंडिया ग्रीन टीमचा कॅप्टनही बनवण्यात आलं. आणि आता अंडर १९ वर्ल्ड कपमध्येही अनुकूलनं दमदार कामगिरी केली आहे.