जयपूर : महेंद्र सिंह धोनी आपल्या शांत स्वभावासाठी ओळखला जातो. पण गेल्या काही काळापासून धोनीचा स्वत:वर असलेला संयम ढासळत चाललाय काय, असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला आहे. राजस्थान विरुद्ध चेन्नई यांच्यात ११ एप्रिलला झालेल्या मॅचमध्ये धोनी संतापलेला पाहायला मिळाला. नो बॉलच्या निर्णयामुळे धोनी अंपायरवर चिडला होता. इतर वेळेस मैदानात कशाप्रकारे वागायचे यासाठी धोनीचे उदाहरण दिले जाते, पण धोनीच असा आक्रस्ताळेपणाने का वागला? असा प्रश्न सर्वांना पडला होता.
धोनीच्या या वर्तणुकीमुळे त्याच्यावर किमान १-२ सामन्यांची बंदी घालायला हवी होती. तो स्वस्तात सुटला, असं वक्तव्य भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने केलं आहे.
सेहवागने क्रिकबझ या वेबसाईटला मुलाखत दिली. या मुलाखतीत कॅप्टन कूलला राग का आला? आणि हा राग योग्य आहे असे तुला वाटते का? असे प्रश्न सेहवागला विचारण्यात आले.
'ज्या प्रकारे धोनीला चेन्नईचा कॅप्टन म्हणून राग आला. त्याचप्रकारे भारताचा कॅप्टन असताना अशाच प्रकारचा राग आला असता तर मी आनंदी झालो असतो. धोनी निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहे. कदाचित तो वर्षभरात निवृत्त देखील होईल. अशा प्रकारे रागावताना धोनीला पहिल्यांदाच पाहिले. धोनी चेन्नई टीमसाठी फारच भावनिक झाला आहे. मला वाटत नाही की धोनीला मैदानात येण्याची गरज होती. मैदानात खेळत असलेले दोन बॅट्समन अंपायरकडे नो बॉल का नाही? अशी चौकशी करत होते', असे सेहवाग म्हणाला.
'मला वाटतं धोनीने केलेल्या प्रकाराबद्दल त्याला किमान १-२ मॅचसाठी बंदी घालता आली असती. कारण असेच घडतं राहिलं तर उद्या दुसऱ्या टीमचा कर्णधारही मैदानात येऊन अंपायरशी वाद घालेल. मग अंपायरची किंमतच काय राहिली? असा प्रश्न देखील सेहवागने उपस्थित केला. धोनीवर कडक कारवाई केली असती तर पुढच्या वेळेस दुसऱ्या कर्णधाराने असे काही करताना विचार केला असता', असं मत सेहवागने व्यक्त केलं.
चेन्नईने टॉस जिंकून राजस्थाला बॅटिंग करण्यास भाग पाडले. राजस्थानने प्रथम बॅटिंग करताना चेन्नईला विजयासाठी १५२ रनचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईची फार ढिसाळ सुरुवात झाली. मात्र यानंतर रायुडू आणि धोनीने खेळ सावरला. चेन्नईला विजयासाठी शेवटच्या ओव्हर मध्ये म्हणजेच २० व्या ओव्हरमध्ये जिंकण्यासाठी १८ रनची गरज होती. धोनी २० व्या ओव्हरमधील तीसऱ्या बॉलवर आऊट झाला. त्याला बेन स्टोक्सने ५८ रनवर आऊट केले. निर्णायक वेळी धोनी आऊट झाल्याने मॅचमध्ये चांगलीच रंगत आली होती.
धोनी आऊट झाल्यानंतर चेन्नईला विजयासाठी ३ बॉलमध्ये ८ रनची गरज होती. बेन स्टॉक्सने ओव्हरमधील चौथा बॉल फुल टॉस टाकल्यानंतर नो बॉल दिला. खरं तर हा नो बॉल देण्याची जबाबदारी स्क्वेअर लेग अंपायरची असते, पण अंपायरने हा नो बॉल दिला. यानंतर स्क्वेअर लेग अंपायरने नो बॉल असल्याचा कोणताही इशारा न केल्यामुळे अंपायरने त्याचा निर्णय मागे घेतला. या सगळ्या गोंधळानंतर धोनी डग आऊटमधून थेट मैदानात आला. धोनीने यावेळी अंपायरशी वादही घातला.
धोनीच्या या गैरवर्तणुकीचा फटका त्याला बसला. त्याच्या मानधनातली ५० टक्के रक्कम दंड म्हणून कापण्यात आली.