चेन्नई : मुंबईविरुद्धच्या मॅचमध्ये चेन्नईचा केदार जाधव दुखापतग्रस्त झाला. मांडीच्या स्नायूंना दुखापत झाल्यामुळे केदार जाधव संपूर्ण स्पर्धा खेळू शकणार नाही. त्यामुळे केदार जाधवऐवजी इंग्लंडचा ऑल राऊंडर डेव्हिड विलीला चेन्नईच्या टीममध्ये स्थान देण्यात आलं आहे. डेव्हिड विलीनं इंग्लंडकडून ३२ वनडे आणि २० टी-20 मॅच खेळल्या आहेत. पहिल्याच मॅचमध्ये चेन्नईनं मुंबईवर रोमहर्षक विजय मिळवला. शेवटच्या बॉलवर एक विकेट राखून चेन्नईनं मुंबईला पराभूत केलं. चेन्नईच्या या विजयाचे शिल्पकार ठरले ते ड्वॅन ब्राव्हो आणि केदार जाधव. ब्राव्होनं ३० बॉल्समध्ये ६८ रन्सची खेळी केली तर केदार जाधवनं २२ बॉल्समध्ये २४ रन्स केले.
या मॅचमध्ये केदार जाधवच्या मांडीला दुखापत झाली. यानंतर जाधवला मैदान सोडून जावं लागलं. अखेर ९ विकेट पडल्यानंतर जाधव पुन्हा बॅटिंगला आला. शेवटच्या ओव्हरमध्ये चेन्नईला विजयासाठी ७ रन्सची आवश्यकता होती. पण केदार जाधवला दुखापत झाल्यामुळे तो धावून एकही रन काढू शकत नव्हता. मुस्तफिजूर रहमानच्या शेवटच्या ओव्हरच्या पहिल्या तिन्ही बॉलला केदार जाधवला एकही रन काढता आली नाही. पण ओव्हरच्या चौथ्या बॉलला जाधवनं सिक्स आणि पाचव्या बॉलला फोर मारून चेन्नईला जिंकवून दिलं.
राजस्थानचा स्पिनर जहीर खानऐवजी न्यूझीलंडच्या ईश सोदीला संधी देण्यात आली आहे. ५० लाख रुपयांना राजस्थानच्या टीमनं ईश सोदीला विकत घेतलं आहे. ईश सोदी सध्या आयसीसी टी-20 बॉलरच्या यादीमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. जहीर खान हा अफगाणिस्तानच्या त्या ४ खेळाडूंपैकी आहे, जे यंदा टी-20 स्पर्धा खेळणार आहेत. लिलावामध्ये ईश सोदीला कोणत्याच टीमनं विकत घेतलं नाही.
केदार जाधवबरोबरच चेन्नईचा दुसरा खेळाडू फॅप डुप्लेसिसही दुखापतग्रस्त आहे. डुप्लेसिसच्या मांडीचे स्नायू दुखावलेत तसंच त्याचं बोटही फ्रॅक्चर झालं आहे. पण डुप्लेसिस लवकरच मैदानात उतरेल, असा विश्वास चेन्नईचा बॅटिंग कोच माईक हसीनं व्यक्त केला आहे.
राजस्थानचा फास्ट बॉलर दुष्मंता चमीरा पाठीच्या दुखापतीमुळे अजूनही श्रीलंकेतच आहे. वैद्यकीय चाचणी झाल्यावरच चमीराच्या खेळण्याविषयी निर्णय घेण्यात येईल. सध्या तीन आठवड्यांसाठी चमीरा खेळू शकणार नाही. चमीराला राजस्थाननं ५० लाख रुपयांना विकत घेतलं होतं.
मुंबईचा फास्ट बॉलर पॅट कमिन्सच्याही पाठीला दुखापत झाली आहे. त्यामुळे कमिन्स संपूर्ण स्पर्धा खेळू शकणार नाही. कमिन्स गेल्या काही दिवसांपासून लागोपाठ टेस्ट क्रिकेट खेळत आहे. कमिन्सला मुंबईनं ५.४० कोटी रुपयांना विकत घेतलं होतं.