'या क्रिकेटरने माझ्या पत्नीविषयी हीन दर्जाची टिप्पणी केली'

ऑस्ट्रेलियाचा उपकर्णधार डेव्हिड वॉर्नरने डी कॉकवर गंभीर आरोप केला आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Mar 9, 2018, 04:52 PM IST
'या क्रिकेटरने माझ्या पत्नीविषयी हीन दर्जाची टिप्पणी केली' title=

सिडनी : ऑस्ट्रेलियाचा उपकर्णधार डेव्हिड वॉर्नरने डी कॉकवर गंभीर आरोप केला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डी कॉकने माझ्या पत्नीविषयी हीन दर्जाची टिप्पणी केली, असा आरोप डेव्हिड वॉर्नरने केला आहे. तसेच माझ्या कुटुंबाच्या समर्थनार्थ मी नेहमी उभा राहीन, असं देखील वॉर्नरने म्हटले आहे.

दोन्ही खेळाडूंना दंड करण्यात आला

आयसीसीकडून बुधवारी डर्बनच्या पहिल्या कसोटी सामन्यात वाद घालणाऱ्या दोन्ही खेळाडूंना दंड करण्यात आला. यात वॉर्नरच्या मानधनाच्या ७५ टक्के, तर डी'कॉकच्या मानधनात २५ टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. 

एका सामन्याची बंदी घातली जाऊ शकते

वॉर्नरला ३ गैरवर्तनाचे गुण देण्यात आले आहेत. यात आणखी एक गुण जमा झाल्यास त्याच्यावर एका सामन्याची बंदी घातली जाऊ शकते. पोर्ट एलिझाबेथ येथे शुक्रवारपासून दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरूवात होईल, यासाठी खेळायला दोन्ही खेळाडूंना परवानगी देण्यात आली आहे. 

'माझ्या वागण्याची मला खंत वाटली'

'मी कदाचित माझ्या रागावरील नियंत्रण गमावले. मी व्हिडीओ पाहिला आणि माझ्या वागण्याची मला खंत वाटली. मी भावनिकदृष्टय़ा वागलो. परंतु माझ्या कुटुंबाचे मी नेहमीच समर्थन करीन. कुटुंब, वर्णभेद किंवा तत्सम गोष्टी कुणीच सहन करणार नाही.', असं ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमांसमोर वॉर्नर म्हणाला,  तसेच 'डी'कॉकने सभ्यतेच्या मर्यादा ओलांडल्या, असा आरोपही यावेळी वॉर्नरने केला.