मायेची तिजोरी; लेकाचं यश जेव्हा आई फाटक्या साडीमध्ये गुंडाळून ठेवते....

आईने अंचितच्या आतापर्यंतच्या सर्व ट्रॉफी आणि मेडल्स फाटलेल्या साडीत बांधून ठेवल्या आहेत. 

Updated: Aug 12, 2022, 09:54 AM IST
मायेची तिजोरी; लेकाचं यश जेव्हा आई फाटक्या साडीमध्ये गुंडाळून ठेवते.... title=

मुंबई : बर्मिंगहॅममधील कॉमनवेल्थ स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारा अचिंत शेउली हा गरिबीत वाढलाय. हावडा जिल्ह्यातील देउलपूरमध्ये राहणारा अचिंत हा दोन खोल्यांच्या घरात राहतो. त्याच्या आईने अंचितच्या आतापर्यंतच्या सर्व ट्रॉफी आणि मेडल्स फाटलेल्या साडीत बांधून ठेवल्या आहेत. 

बर्मिंगहॅममध्ये 73 वजनी गटात सुवर्णपदक जिंकल्यानंतर सोमवारी अचिंत त्याच्या घरी पोहोचला तेव्हा तिच्या आईने जुन्या ट्रॉफी काढून स्टूलवर ठेवून दिल्या होत्या. 

अचिंतच्या घरी आल्यावर त्याची आई पौर्णिमा शेउलीला खूप आनंद झाला. त्या अंचितबद्दल म्हणाल्या, "आता तुझ्या सर्व ट्रॉफी आणि पदकं ठेऊन देण्यासाठी एक कपाट विकत घे."

स्वप्नातही वाटलं नव्हतं

अंचितची आई म्हणते, "आपला मुलगा देशासाठी सुवर्णपदक जिंकेल, असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. अचिंत आल्यावर पत्रकार आणि फोटोग्राफर येणार हे मला माहीत होतं. म्हणूनच या ट्रॉफी आणि पदकं आधीच बाहेर काढून ठेवली होती."

पूर्णिमा पुढे म्हणाल्या, "2013 मध्ये पतीच्या निधनानंतर आलोक आणि अचिंत यांचे पालनपोषण मोठ्या कष्टाने केलं. मात्र देवाचा आशीर्वाद आमच्यासोबत होता. आमच्या घरासमोर जमणार्‍या लोकांच्या संख्येवरून काळ बदलल्याचं दिसून येतंय.

त्या म्हणतात, माझ्या दोन मुलांचे संगोपन करणं माझ्यासाठी किती कठीण होतं हे कोणालाच कळणार नाही. एक काळ असा होता की काही दिवस काहीही न खाता जगावं लागत होतं. त्या कठीण दिवसांना मी शब्दात मांडू शकत नाही.

अंचित कधी हार मानत नाही

अंचितचे प्रशिक्षक अस्तम दास म्हणाले, "अचिंत कधीही हार मानणाऱ्यातला नाहीये. हार न मानण्याच्या वाक्याने त्याला सुवर्ण मिळवून दिलंय. तो माझ्या मुलासारखा आहे. प्रत्येक अडथळ्याशी लढण्याचे धैर्य त्याच्यात आहे."