Defamation suit on MS Dhoni in Delhi High Court: टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि आयपीएलमधल्या चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीविरोधात (MS Dhoni) त्याच्या एका मित्राने कोर्टात धाव घेतली आहे. धोनीच्या दोन व्यावसायिक भागिदारांना त्याच्याविरोधात दिल्ली हायकोर्टात (Delhi HighCourt) मानहानीचा खटला दाखल केला आहे. न्यायमूर्ती प्रतिभा एम सिंह यांच्या समोर 18 जानेवारीला या खटल्याची सुनावणी होणार आहे. धोनीचा एकेकाळचा खास मित्र आणि बिझनेक पार्टनर मिहिर दिवाकर (Mihir Diwakar) आणि त्याची पत्नी सौम्या दास यांनी बदनामी केल्याप्रकरणी अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मविरोधातही याचिका दाखल केली आहे. आपल्या विरोधात एम एस धोनीने द्वेषपूर्ण वक्तव्य केल्याचा आरोप मिहिर दिवाकरने केला आहे.
मिहिर दिवाकर आणि सौम्या दास यांनी धोनीविरोधात रितसर तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत धोनीकडून 15 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा चुकीचा आरोप करण्यात आल्याचं म्हटलं आहे. यामुळे समाजमाध्यमांमध्ये आपली बदनामी झाल्याचंही मिहिर दिवाकर आणि सौम्या दास यांनी म्हटलं आहे.
धोनीने रांचीत केली होती तक्रार दाकल
एमएस धोनीने मिहिर दिवाकर आणि सौम्या दास यांच्याविरोधात अपराधिक गुन्हा दाखल केला होता. यात मिहिर आणि सौम्या यांनी 15 कोट रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप लावण्यात आला होता. धोनीच्या वकिलांनी याबाबतची माहिती मीडियाला दिली होती.
काय आहे नेमकं प्रकरण?
मिहिर दिवाकरने जगभरात क्रिकेट अकॅडमी सुरु करण्यासाठी 2017 मध्ये एमएस धोनीबरोबर करार केला. यासाठी त्यांनी अरका स्पोर्ट्स नावाच्या कंपनीची स्थापना केली. पण या करारतील अटींचं मिहिर दिवाकरने पालन केलं नाही. करारानुसार अरका स्पोर्ट्स फ्रेंचाईजीमधून मिळणाऱ्या उत्पन्नात समान विभागनी केली जाणार होती. पण मिहिरने कोणत्याही नियम आणि अटिंची पूर्तता केली नाही.
धोनीला 15 कोटींचं नुकसान
महेंद्रसिंग धोनीने 15 ऑगस्ट 2021 रोजी अरका स्पोर्ट्समधून अॅथॉरिटी लेटर परत घेतलं. त्यानंतर धोनीच्या कायदे विभागाने मिहिर दिवाकरला अनेक नोटिसा पाठवल्या. पण त्याला कोणतंही उत्तर मिळालं नाही. त्यानंतर धोनीचे वकिल दयानंद सिंह यांनी या सर्व प्रकारात धोनीला 15 कोटींचं नुकसान झाल्याचं म्हटलं आहे.
माहिर दिवाकर हा धोनीचा जवळचा मित्र होता. त्यानंतर त्यांनी बिझनेस पार्टनर म्हणून काम केलं. सोशल मीडियावर त्याने धोनीसोबत अनेक फोटो देखील शेअर केले होते.