एक शतक आणि पाच विक्रम... डेव्हिड वॉर्नरने इतिहास रचला, दिग्गजांना टाकलं मागे

IND vs PAK, 1st Test: पाकिस्तानचा क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून पर्थमध्ये पहिल कसोटी सामना खेळवला जात आहे. पहिली फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने दमदार सुरुवात केलीय. सलामीच्या डेव्हिड वॉर्नरने शानदार शतक झकळावत अनेक विक्रम मागे टाकले आहेत. 

राजीव कासले | Updated: Dec 14, 2023, 03:08 PM IST
एक शतक आणि पाच विक्रम... डेव्हिड वॉर्नरने इतिहास रचला, दिग्गजांना टाकलं मागे title=

David Warner breaks Records: ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानदरम्यान कसोटी मालिका ( AUS vs PAK 1st Test) खेळवली जात असून यातल्या पहिल्या कसोटी सामन्याला पर्थमध्ये सुरुवात झालीय. ऑस्ट्रेलियाने पहिली फलंदाजी करत दमदार सुरुवात केलीय. ऑस्ट्रेलियाचा सलामीचा फलंदाज डेव्हिड वॉर्नरने (David Warner) पहिल्याच कसोटीत शानदार शतक झळकावत इतिहास रचला आहे. त्याने कसोटी कारकिर्दीतल्या 26 व्या शतकांची नोंद केली. या शतकाबरोबरच त्याने अनेक फलंदाजांचे विक्रमही मागे टाकले आहेत. यात सर्वात पहिला विक्रम मोडला तो पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि फलंदाज इंजमाम-उल हकचा (Inzamam-ul-Haq). इंजमामने आपल्या कसोटी कारकिर्दीत 25 शतकं केली होती. आता वॉर्नर इंजमामच्या पुढे गेला आहे. याचबरोबर त्याने रिकी पॉण्टिंग आणि राहुल द्रविड या दिग्गजांचे विक्रमही मोडले आहेत. 

रिकी पॉण्टिंगचा विक्रम मोडला
डेव्हिड वॉर्नरने ऑस्ट्रेलियाचा महान फलंदाज रिकी पॉण्टिंगचाही विक्रम मागे टाकला आहे. रिकी पॉण्टिंगनच्या (Ricky Ponting) नावावर पाकिस्तानविरुद्ध कसोटी सामन्यात पाच शतकांची नोंद होती. आता पाकिस्तानविरुद्ध कसोटी सर्वाधिक शतकांचा मान डेव्हिड वॉर्नरच्या नावावर लागला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सलामीला पलंदाजी करत सर्वाधिक शतकं करणारा वॉर्नर हा क्रिकेट जगतातील तिसरा फलंदाज आहे.

राहुल द्रविडच्या एक पाऊल पुढे
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातील शतक वॉर्नरच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील 49 वं शतक ठरलं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत वॉर्नर भारताचा महान फलंदाज राहुल द्रविडच्या (Rahul Dravid) एक पाऊल पुढे गेला आहे. द्रविडच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 48 शतं होती. 

बॉर्डर-चॅपेलच्या विक्रमाशी बरोबरी
डेव्हिड वॉर्नरने या शतकाबरोबरच जावेद मियांदाद, एलन बॉर्डर, ग्रेन चॅपेल यांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. ऑस्ट्रेलिया-पाकिस्तानदरम्यान खेळवण्यात आलेल्या आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं करण्याचा विक्रम वॉर्नरने केला आहे. वॉर्नर जगातील एकमेव असा सलामीचा फलंदाज आहे ज्याच्या नावावर कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये 20 हून अधिक शतकं आहेत.

वॉर्नरची दीडशतकी खेळी
पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात डेव्हिड वॉर्नरने तब्बल 164 धावांची खेळी केली. यात त्याने 4 षटकार आणि 16 चौकारांची बरसात केली. वॉर्नरच्या तुफान खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवशी पाच विकेट गमावत 325 धावा केल्या. पाकिस्तानतर्फे आमेर जमालने सर्वाधिक 2 तर शाहिन आफ्रिदी, खुुराम शहदाने प्रत्येकी एक विकेट घेतली.