मुंबई : देशात कोरोनाची प्रकरणं वाढतायत. कोरोनाचा फटका काही प्रमाणात क्रिकेटलाही बसला आहे. देशातील वाढत्या कोरोना प्रकरणांमुळे बीसीसीआयने रणजी ट्रॉफी आणि कर्नल सीके नायडू ट्रॉफीसह अनेक प्रमुख स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान यानंतर बीसीसीआय T20 क्रिकेट लीग आयपीएलबाबतही मोठा निर्णय घेणार असल्याची चर्चा आहे.
कोरोनाच्या रूग्णांची संख्या अशीच वाढत राहिली तर यंदाही आयपीएल भारताबाहेर आयोजित करावी लागेल. IPL 2020 चा सीजन कोरोनामुळे UAE मध्ये आयोजित करण्यात आला होता. यानंतर आयपीएल 2021 सीझनचा फर्स्ट हाफ भारतात आणि दुसरा हाफ यूएईमध्ये खेळला गेला होता.
13 जानेवारीपासून रणजी ट्रॉफी टूर्नामेंट सुरु होणार होती. मात्र सध्या रणजी ट्रॉफी स्थगित करण्यात आली आहे. नुकतंच बंगालच्या टीममध्ये सहा जणं कोरोनाबाधित असल्याचं आढळलं. ज्यामध्ये पाच खेळाडूंचा समावेश आहे.
दुसरीकडे मुंबईतील शिवम दुबे देखील पॉझिटिव्ह आढळला असून तो क्वारंटाईनमध्ये आहे. यानंतर बीसीसीआयचे सचिव जय शाह म्हणाले, "रणजी ट्रऑपी आणि कर्नल सीके नायडू ट्रॉफी या महिन्यात सुरू होणार होती. बीसीसीआय खेळाडू, सपोर्ट स्टाफ आणि मॅच अधिकाऱ्यांच्या आरोग्याबाबत कोणताही धोका पत्करणार नाही. त्यामुळेच सलग दुसऱ्या वर्षी ही स्पर्धा पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे."
बीसीसीआय परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि त्यानुसार निर्णय घेतला जाईल. रणजी ट्रॉफी बंगळुरू, अहमदाबाद, चेन्नई, तिरुवनंतपुरम, मुंबई आणि कोलकाता या सहा शहरांमध्ये होणार होती.